कंत्राटदार शिर्केने अनधिकृत बांधलेली कलीना येथील ‘मैत्री’ इमारत झाली अधिकृत!

म्हाडाच्या जमिनीवर पालिकेची परवानगी न घेता ‘मैत्री’च्या अनधिकृत बांधलेल्या मजल्याबाबत, म्हाडाने कंत्राटदार शिर्केवर मेहरबानी करत त्यास अधिकृत केले आहे. ‘मैत्री’ नावाच्या इमारतीत सनदी अधिकारी प्रवीण दराडे, बिपिन श्रीमाळी, हर्षदीप कांबळे, सुधीर ठाकरे, अभिमन्यू काळे, दिपक कपूर, राजेश नार्वेकर, संजय यादव, जवाहर सिंग सारख्या 84 जणांचा समावेश आहे. आता प्रस्तावित ‘मैत्री’ सोसायटी रद्द करत, या इमारतीतील सदनिका लॉटरीच्या माध्यमातून वितरित करणे आणि मेसर्स शिर्के कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

काय आहे म्हाडा प्रशासनाकडे मागणी

सुधारित स्टील+ 12 मजल्यांचे काम, नकाशे मंजूर केले असल्याचे म्हाडा प्रशासनाने अनिल गलगली यांना कळवले आहे. ज्यामध्ये विंग A, B आणि C असून त्यास उपाध्यक्ष/प्राधिकरण यांच्या मान्यतेने, कार्यकारी अभियंता/ इमारती परवानगी कक्ष/ प्राधिकरण यांनी 72 सदनिका बांधण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. सदनिका वितरण करण्याची बाब ही उपमुख्य अधिकारी, पणन, मुंबई मंडळाच्या कार्यकक्षेत येत असल्याने गलगली यांचे निवेदन त्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

29 अनधिकृत माळे झाले अधिकृत

यापूर्वी म्हाडा प्रशासनाने मेसर्स बी. जी. शिर्के कंपनीस 2 मार्च 2017 रोजी नोटीस जारी करुन, अनधिकृत बांधकामाबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. सांताक्रूझ पूर्व कलीना येथील म्हाडाने 4 फेब्रुवारी 2010 रोजी मेसर्स बी.जी.शिर्के यास 13 मजली इमारतीत मध्यम उत्पन्न गटातंर्गत 1279.52 चौरस फुटांचे 150 तर, उच्च उत्पन्न गटातंर्गत 1310.52 चौरस फुटांचे 76 सदनिका अशा 226 सदनिका 36.50 कोटीत बांधण्याचे काम दिले. म्हाडाने मैत्री सहकारी गृहनिर्माण संस्थेतील निर्धारित 76 सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित तसेच, शासनाने मंजूर केलेल्या सदस्यांकरता 15 सदनिका उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली. विंग ए साठी 3 तर विंग बी आणि सी साठी 2 माळयांची परवानगी असताना मेसर्स शिर्के या कंत्राटदाराने 12 माळयाचे बांधकाम केले आणि त्यानंतर तिन्ही विंग मिळून 29 अनधिकृत माळे अधिकृत करण्याची विनंती पालिकेस केली. अनिल गलगली यांनी मागणी केली आहे की मेसर्स शिर्के कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच प्रस्तावित मैत्री सोसायटीस बांधण्यात येणारी सदनिका न देता लॉटरी काढून सदनिका सर्व सामान्यांना उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

84 सदस्यांत संपूर्ण राज्याचे विविध खात्यांचे अधिकारी

मुख्यमंत्री सचिवालयापासून उपमुख्यमंत्री कार्यालय, म्हाडा, एसआरए, गृहनिर्माण, ग्रामविकास, नगरविकास, सहकार, महसूल, भ्रष्टाचार निरोधक ब्युरो, सार्वजनिक आरोग्य, पालिका, सिडको, शिक्षण, जलसंपदा, कृषी, महिला व बालविकास, उद्योग, माहिती व तंत्रज्ञान, पोलिस, विक्रीकर, परिवहन अश्या प्रत्येक खात्याच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची वर्णी लागली असून, 4 प्रर्वतकांमध्ये मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी अभिमन्यू काळे, पोलिस उपायुक्त सुनील रामानंद, गृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव कैलास पगारे आणि गृहनिर्माण विभागाचे उपसचिव व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप शिंदे आहेत तर मुख्य प्रर्वतक झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे अप्पर जिल्हाधिकारी ए.एम.वझरकर आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here