मुंबई मालाडमधील मढ, एरंगल आणि भाटी गाव परिसरात सागरी किनारा क्षेत्रातील अतिक्रमणे मालाड पी उत्तर विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत ५ फिल्म स्टुडीओंची बांधकामे हटवण्याची कारवाई शुक्रवारपासून सुरू झाली असून दोन दिवसात उर्वरीत सर्व अनधिकृत स्टुडीओंचे बांधकामे हटवले जातील, असा विश्वास पी उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही धडक कारवाई हाती घेतली आहे.
मढ परिसरात अनधिकृत फिल्म स्टुडिओ उभारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यात सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनधिकृत फिल्म स्टुडिओंना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली होती. त्यातील काही स्टुडिओ मालकांनी स्वतःहून बांधकामे निष्कासित केली, तर काहींनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र, गुरुवारी ६ एप्रिल रोजी राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) अनधिकृत फिल्म स्टुडिओंवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शुक्रवार सकाळपासून अनधिकृत स्टुडिओ निष्कासित करण्याची कारवाई पी-उत्तर विभागाने सुरु केली.
महानगरपालिकेचे १० अभियंते, ४० कर्मचारी यांच्यासोबत ३ पोकलेन संयंत्र, ३ जेसीबी संयंत्र, २ डंपर, २ गॅस कटर आदींच्या साहाय्याने ही बांधकामे हटविण्यात येत आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बांधकामांचे स्वरूप लक्षात घेता, दोन दिवसात उर्वरित निष्कासन होवून ही कारवाई पूर्ण होवू शकेल.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान)
Join Our WhatsApp Community