दादर पश्चिम येथील केशव सुत उड्डाणपूलाशेजारील फुल विक्रेत्यांवर याठिकाणी होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारी पाकिटमारीचे प्रकार यामुळे महापालिकेने कारवाई केली. परंतु, दुसरीकडे केशवसुत उड्डाणपूलाखालील गाळ्यांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी जागा अडवून पादचाऱ्यांचेही मार्ग बंद केले. याठिकाणी खरेदीला येणाऱ्या नागरिकांमुळे रेल्वे प्रवाशांना गर्दीतून वाट काढत जावे लागत असून यामुळे होणाऱ्या गर्दीचा लाभ उठवत पाकिटमारीसारख्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या पुलाखालील गाळ्यांमधील मोकळ्या जागांमध्ये फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच रेल्वे प्रवाशांना स्थानकात ये-जा करणे सुलभ व्हावे म्हणून महापालिका आणि पोलिसांकडून कोणताही प्रयत्न केला जात नाही. विशेष म्हणजे पोलिसांची बिट चौकीला खेटून फेरीवाले बसून पोलिसांचाही धाक आता फेरीवाल्यांना राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.
दादर पश्चिम येथील केशवसूत उड्डाणपूलाखालील महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कधी काळी या गाळ्यांमध्ये असलेली दुकाने तसेच हॉटेल बंद करून बंदिस्त असलेले गाळे तोडून टाकण्यात आले. या गाळ्यांच्या जागेत सुशोभिकरणाच्या नावाखाली हे गाळे सन २०१३-१४ मध्ये तोडून टाकण्यात आले. तत्कालिन महापालिका सहायक आयुक्त शरद उघडे यांनी पुलाखालील गाळे तोडून स्थानकापर्यंत टॅक्सी तसेच बस सुविधा उपलब्ध करून देण्याचा नावाखाली आराखडा तयार केला होता. परंतु हे गाळे तोडल्यानंतर उघडे यांची बदली झाली आणि त्यानंतर आलेल्या सहायक आयुक्तांनी या तोडलेल्या गाळ्यांकडे लक्ष दिले नाही.
परिणामी ज्या दादर स्थानकासमोर कमी फेरीवाले होते, तिथे या तोडलेल्या गाळ्यांमधील जागा बळकावून फेरीवाल्यांनी जागा बळकावल्या आहे. त्यातील एका गाळ्यांमध्ये तर चक्क एक कुटुंबच वसलेले असून हे कुटुंबच यातील जागा भाड्याने देत आपली दररोजचे पैसे वसूल करत असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण पुलाखाली सुमारे ११ हून अधिक गाळे असून हे गाळे रेल्वे प्रवाशांना चालण्यास सुलभ व्हावे म्हणून गाळ्यांमधील जागा खुल्या करण्यात आल्या. परंतु या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांचेच अतिक्रमण असून या गाळ्यांमध्ये फेरीवाले भिंतीच्या बाजुला चार ते पाच फुटांची जागा खाली सोडून पुढे विक्रीच्या वस्तू लावतात. त्यामुळे खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची दोन्ही बाजुंनी गर्दी होत असल्याने रेल्वे प्रवाशांना या गर्दीतून धड चालताही येत नाही. त्यातच जेवढी जागा सोडली जाते, त्या जागेच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाले बसत असल्याने आधी गाळ्यातून शिरण्याचे एक मोठे आव्हान, त्यातच आत शिरल्यानंतर बाहेर पडण्याचे त्याहून मोठे आव्हान असते.
(हेही वाचा – G-20 Summit च्या आयोजनासाठी भारत सज्ज)
विशेष म्हणजे रेल्वे स्थानकाचा परिसर फेरीवालामुक्त ठेवण्याचा निर्देश देत न्यायालयाने दीडशे मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास निर्बंध घातले आहे. त्यानुसार महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करून स्थानक परिसर तथा त्यापासून दीडशे मीटरच्या अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करणे आवश्यक असतानाही महापालिका आणि पोलिस यांच्याकडे कोणतीही कारवाई होत नाही. याठिकाणी गाडी उभी केली तरी त्यापासून शंभर पावलांपर्यंत फेरीवाले बसत नसले तरी पुढे ते बसतच असतात. तसेच याठिकाणी शिवाजी पार्क पोलिसांची बिट चौकी असूनही पोलिसांचाही या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. या फेरीवाल्यांकडून बेशिस्तपणे वर्तन होत अधिकाधिक मोकळी जागा पादचाऱ्यांसाठी न ठेवता ती जागा अडवून पादचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्यानंतरही पोलिसांची दहशत या फेरीवाल्यांवर नसल्याने पोलिसांच्या आशिर्वादानेच हे बसतात की खरोखरच त्यांची भीती आता फेरीवाल्यांमध्ये राहिलेली नाही, असा सवाल आता रहिवाशांकडून केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community