Dadar : दादरमधील अनधिकृत प्राणिसंग्रहालयात चाललंय काय? जलतरण तलावात अजगर, मगरीनंतर सावरकर स्मारकात धामण 

190

सध्या दादर (Dadar) पश्चिम, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील अनधिकृत प्राणिसंग्रहालय पुन्हा चर्चेत आले आहे. हे प्राणी संग्रहालय बेकायदेशीर आहे, म्हणून या आधी या प्राणी संग्रहालयावर आक्षेप घेण्यात आला होता. या ठिकाणी अत्यंत घातक उभयचर प्राणी ठेवण्यात आले आहेत. आता या प्राणी संग्रहालयातील प्राणी बाहेर पडून परिसरात बिनधास्तपणे वावर करू लागले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दादर (Dadar) येथील या प्राणिसंग्रहालयाला लागूनच महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव (swimming Pool) आहे. आणि या जलतरण तलावाला लागूनच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे. दोन दिवसांपूर्वी या प्राणिसंग्रहालयातून मगरीचे (crocodile) पिल्लू बाहेर आले आणि थेट जलतरण तलावात बिनधास्तपणे वावरू लागले. यावरून निर्माण झालेली चर्चा थांबत नाही तोच शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी याचा प्राणिसंग्रहालयातून धामण बाहेर पडून थेट स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दिसून आली. त्यामुळे आता हे प्राणी संग्रहालय बंद करावे, अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

(हेही वाचा Baby Crocodile In Swimming Pool : दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू)

अजगर मोकाट फिरतोय 

दोन महिन्यापूर्वी महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात अजगराचे पिल्लू दिसले होते. हे पिल्लू अनधिकृत प्राणिसंग्रहालयातूनच आले असावे, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. यावर मनसेचे विभागप्रमुख आणि तरण तलावाचे सदस्य संतोष धुरी यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. या अजगराचे पिल्लू (Python) ५ फूट लांबीचे होते. परिसरात अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असणे अशी परिस्थिती नाही, तरीही अजगराचे पिल्लू कसे दिसले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तेव्हाच त्यांनी हे प्राणिसंग्रहालय बंद करावे, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे तेव्हा अजगराचे पिल्लू पकडण्यात यश आले नाही, त्यामुळे आता या पिल्लाचे मोठ्या अजगरामध्ये रूपांतर झाले असावे आणि तो परिसरात मोकाट फिरत असावा, अशी चर्चा सुरु आहे. त्यानंतर याच जलतरण तलावात दोन दिवसांपूर्वी मगरीचे पिल्लू दिसले आणि शुक्रवारी सावरकर स्मारकात चक्क धामणीचे (Ptyas mucosa Snake) पिल्लू आढळून आले आहे. सुदैवाने सर्प मित्रांना या धमणीचे पिल्लू पकडण्यात यश आले आहे. हे सगळे प्राणी या प्राणिसंग्रहालयातून बाहेर पडत असल्यामुळे आता हे प्राणिसंग्रहालय बंद करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.