सुशासन सप्ताहानिमित्त उत्तम प्रशासनाच्या कार्यपद्धती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘प्रशासन गांव की ओर’ अर्थात ‘प्रशासन चालले गावांकडे’ या मोहिमेचा प्रारंभ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाला. ‘चांगल्या प्रशासनासाठी एक राष्ट्रीय चळवळ सुरु करण्याचे काम, ‘प्रशासन गांव की ओर’ या मोहिमेमुळे घडून येईल आणि सरकारमधील तसेच सरकारबाहेरील सर्व संबंधित भागीदारांना प्रेरणा मिळेल’, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
या उद्देशाने सुरु करण्यात आली मोहीम
‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 20 ते 25 डिसेंबर 2021 या काळात सुशासन सप्ताह पाळण्यात येत आहे. यासाठी शीर्ष विभाग म्हणून ‘प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग’ जबाबदारी पार पाडेल. ‘प्रशासन गांव की ओर’ या मोहिमेद्वारे, सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सेवा प्रदान करण्यात सुधारणा करण्यासाठी सर्व जिल्हे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक राष्ट्रीय चळवळ चालवली जाईल’, असे सिंह यांनी सांगितले. ‘सातशेपेक्षा अधिक जिल्हाधिकारी ‘प्रशासन गांव की ओर’ मध्ये सहभागी होतील आणि आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात तहसील/ पंचायत समितीच्या मुख्यालयांना भेटी देतील. लोकांच्या तक्रारींचे वेळेवर निवारण व्हावे आणि त्यांना सेवा प्रदान करण्याची पद्धत अधिक सुधारावी, या उद्देशाने हा उपक्रम केला जात आहे’, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
नवभारताची वाटचाल यशस्वी
‘पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातील पुढच्या पिढीच्या प्रशासकीय सुधारणा या अमृतकाळात भारतातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये पोहोचवाव्यात’, असा यामागचा उद्देश असल्याचे सिंह यांनी सांगितले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रतिनिधींना परिवर्तनाचे वाहक बनण्याचे आवाहन केले आणि अधोरेखित केले की, जेव्हा चांगल्या पद्धती सामायिक केल्या जातात तेव्हा त्या सर्वोत्तम पद्धती बनतात आणि त्यापैकी काही अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट ठरतात आणि उच्च दर्जा स्थापन करतात . मंत्री पुढे म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि प्रस्थापित नियम आणि कार्यपद्धतींचे पालन करणारे प्रशासन देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळेच नवभारताची वाटचाल यशस्वी होईल, असेही त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: मुंबईत अवयवदान, किती जणांना मिळाले जीवनदान? )
Join Our WhatsApp Community