-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र शासनाच्या नॅशनल अॅक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (नमस्ते) योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेत कार्यरत २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर देशभरातील विविध महानगरपालिकांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले आहे. देशभरातील अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांची तसेच सन्मानासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘नॅशनल अॅक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ (नमस्ते) ही योजना राबविण्यात येत आहे. (BMC)
केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच (पीपीई किट) तसेच ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात गुरुवारी २० फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित सोहळ्यात करण्यात आले. स्वच्छता उद्योजकता योजनेअंतर्गत यांत्रिक स्वच्छता वाहनांच्या खरेदीसाठी अनुदानासह कमी दराने कर्जास पात्र लाभार्थ्यांना तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने स्वच्छताविषयक उपकरणांच्या खरेदीसाठी कर्जास पात्र लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्राचे वाटपही यावेळी करण्यात आले. त्यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार बोलत होते. (BMC)
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana मध्ये मोठा बदल; ९ लाख महिला ठरणार अपात्र)
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे सचिव अमित यादव, वरिष्ठ आर्थिक सल्लागार योगिता स्वरुप, राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आर्थिक व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात कुमार सिंग, महाराष्ट्राच्या सामाजिक व न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लहुराज माळी यांची यावेळी उपस्थिती होती. (BMC)
स्वच्छता कर्मचारी स्वत:चे जीव धोक्यात घालून ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा प्रतिकूल परिस्थितींमध्ये स्वच्छतेचे कार्य करत असतात. त्यांनी हे काम केले नाही तर प्रत्येक कुटुंबीयांना त्यांचे घर, परिसर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतील. मात्र, नागरिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणूनच, देशभरातील अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांची तसेच सन्मानासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘नॅशनल अॅक्शन फॉर मॅकेनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ (नमस्ते) ही योजना राबविण्यात येत आहे. (BMC)
(हेही वाचा – पाकिस्तानच्या ISI च्या पथकाने दिली बांगलादेशला भेट; भारत बनला सतर्क)
मलनि:स्सारण वाहिन्यांमध्ये उतरुन मानवी पद्धतीने स्वच्छता करण्याऐवजी पूर्णत: यांत्रिक पद्धतीने स्वच्छतेचे काम केले जावे. तसेच, स्वच्छता करताना होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करुन नोंदणी करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. त्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच (पीपीई किट) तसेच ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण केले जात आहे. (BMC)
आजवर देशभरातील ६५ हजार ६० कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. पैकी ३२ हजार ७३४ कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक उपकरणांचा संच आणि १५ हजार १५३ कर्मचाऱ्यांना ‘आयुष्मान कार्ड’ वितरित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची या योजनेत नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने याबाबतीत केलेली कार्यवाही प्रशंसनीय असून याच धर्तीवर देशभरातील महानगरपालिकांनीही कार्य करावे, अशी अपेक्षाही वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केली. (BMC)
(हेही वाचा – विधिमंडळ समित्यांकडे राजकीय पक्षांचा पाठिंबा नाही; विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांची नाराजी)
अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी प्रास्ताविक करताना म्हणाल्या, मुंबई महानगरपालिका ही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. ‘नमस्ते’ योजनेसाठी महानगरपालिकेच्या २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रचालन, मलनि:स्सारण प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापन आदींच्या माध्यमातून स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जातात. मुंबईमध्ये व्यापक मलनि:स्सारण वाहिनीचे जाळे असून यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यावर प्रशासनाचा कायमच भर असतो. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपयोगात असलेली स्वच्छताविषयक उपकरणे तसेच वाहनांची मान्यवरांनी पाहणी केली. तसेच, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व योजनेवर आधारित चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community