राज्यातील प्राथमिकसह सर्व माध्यमांच्या शाळांमधून स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राबविण्यात येत आहे. मुंबईतील महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित-विनाअनुदानित शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या अभियानात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळेला २१ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव यांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, हे अभियान मुंबईत प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. मुंबईत महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित-विनाअनुदानित शाळांमध्ये उपरोक्त उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे गुणांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टप्पे ठेवण्यात आले आहेत. त्यात विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी एकूण ६० गुण असतील. तसेच शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी एकूण ४० गुण असतील. अशाप्रकारे दोन्ही गट मिळून १०० गुण देण्यात येणार आहेत. (BMC)
(हेही वाचा – BMC : येत्या रविवारी उद्यानात गुंजणार संगीताचे सूर)
मुंबईत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला २१ लाख रुपये, दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला ११ लाख रुपये, तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला ७ लाख रुपये असे एकूण ३९ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत. या शाळांची निवड मूल्यांकन समितीद्वारे करण्यात येईल. पुरस्कार प्राप्त शाळा त्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन करतील. याबाबतचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस असतील. (BMC)
असे व्हा अभियानात सहभागी
या अभियानात सहभागी होण्यासाठी मुंबईतील महानगरपालिका, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना निर्देश देण्यात आले आहेत की, https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपरोक्त उपक्रमाबाबतची कागदपत्रे School Portal येथे अपलोड करावीत. तसेच अधिक माहितीकरिता व मार्गदर्शनासाठी या संकेतस्थळावर Headmaster Manual उपलब्ध करुन देण्यात आले आहे. १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शाळांनी संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी कळवले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community