आतापर्यंत ज्या-ज्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्यापैकी निर्मला सीतारामण यांचे सादरीकरण सर्वात वाईट होते, असे स्पष्ट मत अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ सत्रात ते बोलत होते.
डॉ. जाधव म्हणाले, अर्थसंकल्प हा केवळ जमाखर्चाचा ताळेबंद नसतो, तर त्या-त्या आर्थिक वर्षातील सरकारची आर्थिक ध्येयधोरणे, उद्दीष्ट्ये काय असतील, याचा आढावा अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना घेत असतात. त्यात नव्या योजना, कुठल्या क्षेत्रात किती गुंतवणूक होणार आहे, याची विस्तृत माहिती देणे अपेक्षित असते. येत्या आर्थिक वर्षात सरकारकडे जमा होणारी रक्कम आणि खर्च याचा आढावा, पुढच्या वर्षीसाठी व्यक्त केलेला अंदाज, मागच्या अर्थसंकल्पाचा ताळेबंद अशा तीन टप्प्यांत अर्थसंकल्प सादर केला जातो.
अर्थसंकल्प सादर करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. मला असे वाटते की, निर्मला सीतारामण यांनी यातील सगळ्यात वाईट सादरीकरण केले. कारण, बजेटच्या सुरुवातीला देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या देशासहीत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर किमान पाच ते दहा मिनिटे भाष्य केले पाहिजे. यावेळी आणि याआधीचे अर्थसंकल्प सादर करताना सीतारामण यांनी हा संकेत पाळला नाही. यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सुरुवातीला फक्त एक आकडा जाहीर केला. तो जीडीपी संदर्भात होता. सध्याचा जीडीपी आणि पुढच्या वर्षीचा संकल्पित जीडीपी यावर त्यांनी भाष्य केले. हा जगातला सर्वाधिक वृद्धीदर असेल, यापलिकडे त्या काहीही बोललेल्या नाहीत. याचा अर्थ सगळ्यांनी इकोनॉमिक सर्व्हे वाचला असे त्यांनी गृहित धरले. हे चूक आहे, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
आयकरातील सूट दिलासादायक
आयकराच्या रचनेतले बदल खूप पूर्वीपासून अपेक्षित होते. ७ लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचे असेल त्यांना काहीही कर द्यावा लागणार नाही ही तरतूद दिलासाजनक आहे. मात्र, कर दरांमध्ये सर्वांत मोठी कपात आहे ती सर्वांत मोठ्या टॅक्स ब्रॅकेटसाठी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे ३० लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी. यात कोट्यधीश/अब्जाधीश आले. वास्तविक पाहता त्यांना करकपात जास्त प्रमाणावर मिळेल. याचा अर्थ खूप वाढलेली आर्थिक विषमता कमी व्हायला मदत होईल, हे संभवत नाही, असेही डॉ. जाधव म्हणाले.
Join Our WhatsApp Community