अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन ६ एप्रिलला संपणार असून तब्बल ६६ दिवस सुरू राहणार आहे. १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत अधिवेशनात अवकाश घेऊन दुसरा टप्पा १२ मार्चपासून सुरू होईल. रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरले आहे तसेच रेल्वेमार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्मला सीतारामन रेल्वेबाबत कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता सर्वांना लागली असून यंदा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. रेल्वेला बजेटमधून काय काय मिळण्याची शक्यता आहे याबाबत आढावा घेऊया…
( हेही वाचा : ठाणेकरांनो लक्ष द्या! १८ जानेवारीला पाणीपुरवठा राहणार बंद)
बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार?
मोदी सरकार ४०० वंदे भारत ट्रेनची योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरू शकते. या नव्या गाड्या सुरू झाल्यानंतर राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससह सर्व हाय-स्पीड गाड्यांमध्ये हळूहळू बदल करण्यात येणार आहे. सर्व मार्गांवरील गाड्यांचा ताशी वेग १८० कि.मी पर्यंत वाढवता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रेल्वेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद मागील आर्थिक वर्षात १.४ लाख कोटी होती यामध्ये २९ टक्क्यांनी वाढ होऊन रेल्वेसाठीची तरतूद १.८ लाख कोटी होण्याची शक्यता आहे. यावेळी रेल्वेचे आधुनिकीकरण आणि पायाभूत गुंतवणुकीवर भर दिला जाणार आहे.
रेल्वेच्या आधुनिकीकरणात तेजस, हमसफर, वंदे भारत, व्हिस्टाडोम कोच तसेच सर्व स्थानकांचे अपग्रेडेशन, विद्युतीकरण आणि अनेक रेल्वे मार्गांच्या दुहेरी करणाच्या योजनांचा समावेश आहे. रेल्वेच्या कमाईत वाढ झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या भाडेदरात कपात होऊ शकते. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही तरतूद वाढवण्याची शक्यता आहे.