जेवढा प्रवास कराल, तेवढाच टोल भरा, गडकरींची राज्यसभेत घोषणा

प्रवाशांचा प्रवास अति जलद आणि सोयीस्कर होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. टोल प्लाझांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 6 महिन्यांमध्ये रस्त्यांवरील टोल नाके बंद करण्याचा सरकार प्रयत्न करणार असून, जितक्या अंतराचा प्रवास होणार आहे तितकाच टोल प्रवाशांना भरावा लागेल. यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले गडकरी?

राज्यसभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. टोलसाठी तीन प्रकारचे नवे तंत्रज्ञान आणण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या प्रकारात वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याबाबत, दुसरा पर्याय आधुनिक नंबर प्लेट संदर्भात असून तिस-या प्रकारात जेवढा प्रवास तेवढीच टोल आकारणी करण्याची आहे. येत्या महिन्याभरात आणखी एखादा पर्याय समोर येण्याची शक्यता असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

प्रवासानुसार टोल

जर एखाद्या प्रवाशाला 20 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तरी त्याला सध्याच्या नियमाप्रमाणे 75 किलोमीटरचा टोल भरावा लागतो. मात्र नव्या प्रणालीनुसार आता जितका प्रवास होईल तितकाच टोल भरावा लागेल, अशी माहिती गडकरी यांनी राज्यसभेत दिली आहे.

तसेच या नव्या तंत्रज्ञानांमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी कमी होईल, तसेच वाहतुकीवर होणारा परिणामही कमी हाईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here