सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म विषाणूपासून होणारे कोरोना सारखे इतरही संभाव्य प्राणघातक गंभीर आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या अंतर्गत तयार केलेल्या जैवसुरक्षा श्रेणी-3 अर्थात बायोसेफ्टी लेव्हल-3 (BSL-3) या पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.
Today, delighted to launch 1st ever Mobile BSL-3 lab in Nasik, a value addition to the Government’s efforts to strengthen the healthcare infrastructure through The Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission (PM-ABHIM) under the dynamic leadership of our pic.twitter.com/uzFhuZ7mfb
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) February 18, 2022
देशातील दुसरी प्रयोगशाळा नाशिकमध्ये
बायोसेफ्टी लेव्हल-3 प्रयोगशाळा ही देशातील दुसरी प्रयोगशाळा नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली. 25 कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे महाकवी कालिदास कलामंदिर येथे शुक्रवारी नाशिकमध्ये लोकार्पण करण्यात आले. देशात 4 मोबाईल बायोसेफ्टी लेव्हल-3 प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये प्रथमच उपलब्ध झाली आहे. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरणे असून ज्यामध्ये देशी आणि विदेशी सूक्ष्मजीवांवर संशोधन करण्यात येणार आहे.
स्वदेशी बनावटीची बायोसेफ्टी प्रयोगशाळा
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा भाग म्हणून आरोग्य संशोधन संचालनालय आणि भारतीय वैद्यकीय परिषद यांनी एक स्वदेशी बनावटीची बायोसेफ्टी श्रेणी-3 ची प्रतिबंधक क्षेत्रासाठी विशेष बनवून घेतली आहे. या प्रयोगशाळेच्या मदतीने, नव्याने येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा शोध घेणं शक्य होण्यास मदत होणार आहे. बायोसेफ्टी श्रेणी-3 फिरत्या प्रयोगशाळेविषयी आयसीएमआर आणि क्लेंज़ाईड्स कंपनीने एकत्र येत, भारतातील पहिली फिरती बीएसएल-3 अद्ययावत प्रयोगशाळा बायोक्लेंज़ची रचना करत विकसित केली आहे. अत्याधुनिक अशी बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा, संपूर्ण भारतीय साहित्य वापरून केल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कौतुकही केले.
कशी असणार बीएसएल-3 फिरती प्रयोगशाळा
- बायोसेफ्टी लेव्हल-3 ही प्रयोगशाळा हवाबंद असून, तिथे प्रवेश नियंत्रित आणि जैव-संसर्ग प्रतिबंधक असणार आहे. या प्रयोगशाळेत एचईपीए फिल्टरेशन आणि जैविक द्रवरुप कचरा संसर्ग प्रतिबंधक व्यवस्था देखील आहे. यामुळे, या प्रयोगशाळेला बीएसएल-3 अत्याधुनिक असा दर्जा मिळाला आहे.
- अतिशय आधुनिक अशा स्वयंचलित नियंत्रण व्यवस्थेद्वारे तिचे नियंत्रण केले जाऊ शकेल, ज्यामुळे संशोधनाच्या जागी हवेचा निगेटिव्ह दाब कायम ठेवला जाईल. तसेच उपकरणांच्या गुणवत्तेचे निकष आणि आवश्यक त्या महितीचे व्यवस्थापन देखील करण्यात येणार आहे.
- बायोक्लेंज प्रयोगशाळेत, दोन बायोसेफ्टी कॅबिनेट्स (श्रेणी II A2 प्रकार) असून त्यात, नमुने हाताळणी, निर्जंतुकीकरणासाठीची ऑटोक्लेव्ह व्यवस्था, गतिमान पद्धतीचे पास बॉक्स आणि जलद हस्तांतरण व्यवस्था ज्याद्वारे सर्व साहित्य लॅबच्या आतबाहेर जलदगतीने नेता येणं सोयिस्कर होणार आहे.
अशी आहेत बायोसेफ्टी लेव्हल-3 चे वैशिष्ट्ये
- अमेरिका, चीन, फ्रान्स व इटली या देशांनंतर भारताकडेच अत्याधुनिक अशी बायोसेफ्टी लेव्हल-3 ही मोबाईल द्वारे ऑपरेट होणारी फिरती प्रयोगशाळा आहे.
- देशातील पहिली प्रयोगशाळा महाराष्ट्राला मिळाली असून, देशात अशा एकूण 4 लॅब दिल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी कोरोनासारख्या सुक्ष्म जीवाणूंचा प्रादूर्भाव वाढेल, त्याठिकाणी ही गाडी पोहोचेल आणि तेथील नागरिकांची तपासणी करेल.
- जर रूग्ण आढळला तर त्यावर गाडीतच उपचार करण्याची व्यवस्थाही असणार आहे. या माध्यमातून संसर्ग रोखला जाण्यास देखील मदत होणार आहे.
- बायोसेफ्टी लेव्हल-3 ही मोबाईल व्हॅनद्वारे वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे. या मोबाईल प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी 25 कोटी रुपये खर्च लागला.