आता ‘यांच्यासाठी’ कोविशिल्डच्या डोसमधला कालावधी झाला कमी…काय आहे आरोग्य मंत्रालयाचा निर्णय?

योग्य कारणांसाठी परदेशी जाणा-या नागरिकांसाठी कोविशिल्डच्या दुस-या डोससाठीचा कालावधी कमी करण्यात आला आहे.

85

कोविडच्या दुस-या लाटेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त ज्यांना भारताबाहेर जायचे आहे, त्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेणं बंधनकारक आहे. पण कोविशिल्डच्या दुस-या डोसमधील कालावधी हा आरोग्य मंत्रालयाकडून 84 दिवसांचा करण्यात आल्यामुळे, सध्या दुसरा डोससाठी अशा नागरिकांना वाट बघावी लागत आहे. त्यामुळे परदेशात जाण्यासाठी त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. आता योग्य कारणांसाठी परदेशी जाणा-या नागरिकांसाठी कोविशिल्डच्या दुस-या डोससाठीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यासाठीची नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आली आहे.

काय आहे निर्णय?

शैक्षणिक, रोजगार आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणा-या भारतीयांसाठी कोविशिल्डचा कालावधी कमी करण्यात आला आहे. या नागरिकांपैकी कोविशिल्डचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना 84 दिवसांऐवजी 28 दिवसांत लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.

(हेही वाचाः आता म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार! ५ जणांना अटक! )

खालील बाबी तपासणे आवश्यक

  • यानुसार लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी विद्यार्थ्यांना वैध पुराव्यानिशी म्हणजेच, परदेश प्रवेश मिळाल्याचे निश्चित पत्र, परदेशी व्हिसा, तसेच व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आयडी सादर करणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे.
  • तसेच नोकरीनिमित्त परदेशी जाणा-या नागरिकांना इंटरव्ह्यू लेटर किंवा नोकरीचे ऑफर लेटर पुरावा म्हणून सादर करावे लागणार आहे.
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठीचा पुरावा खेळाडूंना किंवा संबंधित व्यक्तींना सादर करावा लागणार आहे.
  • वरीलपैकी योग्य ती कागदपत्र नसल्यास नागरिकांना या विशेष लसीकरणाचा लाभ घेता येणार नाही, असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत सुद्धा लसीकरण होणार

मुंबईतील जी मुले परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाार आहेत, त्यांचे लसीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु खासगी रुग्णालयांमध्ये अनेक मुलांनी पहिला डोस घेतला असला, तरी दुसरा डोसचा घेण्याचा कालावधी ८४ दिवसांचा असल्याने अनेक मुलांची परवड होत होती. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन राजावाडी, कस्तुरबा आणि कुपर रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानंतर कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी कमी करण्यासाठी, आयसीएमआरकडे पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही महापालिकेला केल्या होत्या. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हा कालावधी कमी करण्यात आल्याने आता या लसीकरण केंद्रांवर परदेशी जाणा-या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.