राज्यातील गायकांसाठी रामदास आठवले देणार एका महिन्याचे वेतन

आंबेडकरी गायक कलावंतांना 1 मे रोजी प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत रामदास आठवले करणार आहेत.

राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे आता गायकांच्या मदतीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले धावून आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आपल्या एका महिन्याच्या वेतनातून राज्यातील आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत.

गायक कलावंतांची परिस्थिती बिकट

कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात आंबेडकरी गायक कलावंतांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांसमोर आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून आंबेडकरी कलावंतांना कोणतेही कार्यक्रम मिळालेले नाहीत. गतवर्षी कोरोना रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती चे जाहीर  कार्यक्रम करण्यात आले नाहीत. यंदाही नेमका 14 एप्रिलला आंबेडकर जयंती पासून राज्यात लॉकडाऊन लागला असल्याने, आंबेडकरी कलावंतांना  कार्यक्रम मिळालेले नाहीत. त्यामुळे दोन्ही वर्षी आंबेडकरी कलावंतांचा रोजगार बुडाला आहे.

(हेही वाचाः सरकारकडून मदत जाहीर, पण अजून पोहचलीच नाही? लॉकडाऊनच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह!)

मिळणार प्रत्येकी 5 हजार

म्हणूनच आंबेडकरी गायक कलावंतांना 1 मे रोजी प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत रामदास आठवले करणार आहेत. एका महिन्याच्या वेतनाचे 2 लाख रुपये ते आंबेडकरी कलावंतांना मदत म्हणून वाटणार आहेत. जे आंबेडकरी गायक कलावंत केवळ गायन कला यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत, जे इतर ठिकाणी नोकरी किंवा शासकीय लाभ किंवा पेन्शन घेत नाहीत आणि परिवर्तन कला महासंघाशी संलग्न आहेत, अशा गरजू आणि ज्येष्ठ 40 कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करण्यात येणार आहे. ज्यांची नावे यादीमध्ये घेण्यात आली आहेत, त्यांना त्यांच्या बँक खात्यावर मदत पाठवण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here