गुरुवारी, ३ जून रोजी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची प्रक्रिया जाहीर केली. सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आले आहे. तिथे सर्व व्यवहार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. या अनलॉक प्रक्रियेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात ज्या जिल्ह्यात झाली, त्या अमरावती जिल्ह्यात मात्र अजूनही परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. एकूणच आजच्या अनलॉकच्या पहिल्या टप्प्यावर नजर टाकल्यास मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरूच राहणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडा सुटला!
कोरोनाची दुसरी लाट विदर्भातून सुरु झाली. अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर हा कोरोना विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे पसरला. पुढे तो मराठवाड्याकडे सरकरला. आता हाच भाग लॉकडाऊनच्या विळख्यातून बाहेर आला आहे. फक्त कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनक म्हणून ओळखला जाणारा अमरावती जिल्हा अजूनही गंभीर आहे, हा जिल्हा लेव्हल २ मध्ये आहे, तर अकोला हा विदर्भातील आणखी एक जिल्हा लेव्हल ३ मध्ये आहे. हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण विदर्भात कोरोना आता नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. मॉल्स, हॉटेल, दुकानांना वेळेचे बंधन नाही. लग्न सोहळ्यासाठी 200 व्यक्तींना परवानगी असेल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी नसेल. क्रिंडागण, खासगी कार्यालये सुरू राहणार. तसेच थिएटर, सलून, जिम, शूटिंग आणि कार्यालये सुरू राहणार आहे.
(हेही वाचा : राज्यात अनलॉकला सुरुवात… कोणते जिल्हे होणार सुरू?)
पश्चिम महाराष्ट्र अडकला!
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा अजूनही कायम आहे. विशेषतः सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अजूनही कमी होण्याच्या मार्गावर नाहीत. सांगली, सातारा २ जिल्हे तिसऱ्या टप्प्यात आहेत, तर पुणे जिल्हा हा चौथ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ४० ते ६० टक्के ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत. तर पॉझिटीव्ही रेट १० ते २० टक्के आहे. या भागातील सातारा जिल्ह्याने आजही सरकारची चिंता वाढवलेली आहे. तर पुणे जिल्ह्यात शहरी भागात दिवसाला ३००-४०० रुग्ण सापडत आहेत, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र दिवसाला १ हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याची चौथी लेव्हल आहे.
कोकणपट्टाही ऑब्झरव्हेशन खाली!
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ही कोकणातील दोन जिल्हे तिसऱ्या टप्प्यात आहेत, तर रायगड आणि पालघर या जिल्ह्यांची लेव्हल ४ आहे. कोकणात रुग्ण संख्या वाढत आहे. ती अजून कमी झालेली नाही, हे दिसत आहे. त्यामुळे सध्या हे जिल्हेही प्रशासनाच्या ऑब्झरव्हेशन खाली असणार आहेत.
(हेही वाचा :अखेर बारावीचीही परीक्षा रद्द! )
Join Our WhatsApp Community