नाशिक जिल्ह्यामध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक वेधशाळेने 5.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला आहे.
( हेही वाचा : होळीच्या दिवशीच का ट्रेंड होतोय #HinduPhobicSwiggy ट्वीटर ट्रेंड? )
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड तसेच सिन्नर तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी विजेच्या कडकडाटासह नाशिक शहर आणि लगतच्या परिसरात जोरदार पाऊस पडला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कांदा, द्राक्ष, गव्हाच्या पिकाचे नुकसान
दरम्यान सोमवारी झालेल्या पावसामुळे कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये निफाड तालुक्यात 191 गावातील 2798 शेतकऱ्यांचे 2685 हेक्टरवर नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा निफाड तालुक्याला बसला असून तालुक्यातील 135 गावांमध्ये नुकसान झाले आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये चार जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन दिवसाच्या पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे कांदा, त्यानंतर द्राक्ष आणि गव्हाचे नुकसान झाले आहे काही भागांमध्ये मक्याचे नुकसान झाले असून पालेभाज्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.