तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशलगतच्या किनारपट्टीवर गुरुवारी सकाळी थडकणा-या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारच्या अंदाजपत्रात व्यक्त केला. या अंदाजपत्रात दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात वीकेण्डला पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ भागांत पाऊस कमी होईल, अशी माहिती मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली. मात्र मुंबईत पावसाची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
किमान तापमान मात्र घटणार नाही
बुधवारी सायंकाळी कमी दाबाच्या विकसित क्षेत्राचे (डीप डीप्रेशन) रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. तामिळनाडूतील पाँडिचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान भागांत गुरुवारी सकाळी ८ डिसेंबरला पोहोचेल. शनिवारपर्यंत या भागांत मुसळधार पाऊस होईल. गुरुवारपासून दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होईल. शनिवारपर्यंत पाऊस सुरु राहील. मराठवाडा आणि मध्य प्रदेशात शुक्रवार-शनिवार पाऊस होईल. तर विदर्भात रविवारी पावसाची शक्यता भारतीय वेधशाळेने व्यक्त केली आहे. चक्रीवादळामुळे राज्यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्राजवळ बाष्प वाहून येईल. या बाष्पाच्या प्रभावाने राज्यात हलका पाऊस होईल. येत्या चार दिवसांत राज्यातील विविध भागांत किमान तापमान मात्र घटणार नाही. राज्यात किमान तापमानात दोन ते चार अंशाने वाढ होईल, असाही अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
(हेही वाचा मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली…)
Join Our WhatsApp Community