राज्यात ७ आणि ८ एप्रिल हे दोन दिवस उष्णतेची लाट होती, त्यानंतर हवामान खात्याने ९ एप्रिलपासून पुढील ५ दिवस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत मेघ गर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती, त्याप्रमाणे शुक्रवारी, ९ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे वादळी पाऊस पडला, तसेच अन्य ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र या पावसामुळे विदर्भातील संत्र, मराठवाड्यातील द्राक्ष आणि कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
कोकणात सध्याचा मोसम हा आंब्याचा असतो. एकूण प्रमाणात केवळ ३० टक्के आंबे झाडावरून काढले आहेत. अद्याप ७० टक्के आंबे झाडावरच आहेत. अशा वेळी आता जर पाऊस आला, तर आंबा झाडावरच खराब होणार आहे. असे मागील ४-५ वर्षांपासून होत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान होणार आहे, त्याशिवाय शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असणार आहे. मुंबई पाठवायचा आंबा खराब होण्याची शक्यता आहे.
– अशोक हांडे, प्रमुख आंबा व्यापारी
आधीच लॉकडाऊन त्यात पाऊस!
या ५ दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपीटही होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आधीच कोरोना काळात मागील वर्षभर सर्व व्यवहार ठप्प होते, त्यामुळे पिकवलेला सगळा माल पडून राहिला, भाजीपाला रोजच्या रोज सोडून जात होता. हंगामी पिकांची मागणी नव्हती, त्यामुळे तो माल पडून राहिला. आता पुन्हा कोरोनाचे संकट उद्भवले आहे. कोरोना वाढू लागल्याने आधीच कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थिती आता भर उन्हाळ्यात वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे उरले सुरलेही ‘वाहून’ जाणार का?, मागच्या वर्षी तरी पीक आले होते, आता पावसामुळे पिके झोपल्यास कोरोनाचे संकट थोडे कमी होईल, व्यवहार पूर्वपदावर येतील, तेव्हा बाजरात विकायला माल हातात असेल का, अशी चिंता शेतकऱ्यांना भेसडावू लागली आहे.
येत्या 4-5 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत मेघ गरजनेसहित वादळी पावसाची शक्यता आहे . तसेच एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपचा पाऊस त काही ठिकाणी अपेक्षित आहे. या कालावधीत विदर्भातीलकाही जिल्ह्यात ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/6nSSBSns68
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 8, 2021
फळ बागायतदारांचे प्रचंड नुकसान होणार!
सध्याच्या अवकाळी पावसाचा विदर्भातील शेतकऱ्यावर फारसा परिणाम होणार नाही, कारण येथील कोरडवाहू शेतकऱ्यांची कापूस आणि तूर ही पिके काढून झाली आहेत. आता नुकसान होईल ते भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे. मात्र ज्या शेतकऱ्याने कापूस व्यवस्थित साठवून ठेवला नसेल, अथवा मिलमध्ये तो व्यवस्थित ठेवला नसेल, तर या अवकाळी पावसात कापूस भिजून नुकसान होईल. असे नुकसान अनेक शेतकऱ्यांचे होत असते, असे हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपाणे ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना म्हणाले. या व्यतिरिक्त फळ बागायतदारांचे मात्र या अवकाळी पावसात प्रचंड नुकसान होणार आहे. सध्या संत्र, द्राक्ष, आंबा हे फळ झाडावर आहे. वादळी पावसात ही सगळीच्या सगळी जमिनीवर पडतात आणि खराब होतात. त्यामुळे फळ बागायतदारांचे नुकसान होणार आहे, असेही प्रा. चोपाणे म्हणाले.
(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक! लॉकडाऊन लावण्याबाबत होणार चर्चा )
Join Our WhatsApp Community