मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता ‘यात्री’ मोबाइल या अॅप्लिकेशनवर लोकल ट्रेनच्या LIVE लोकेशनची माहिती मिळते. १३ जुलै २०२२ रोजी हे यात्री ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. अल्पावधीतच या ॲपला प्रवाशांची पसंती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय रेकवर जीपीएस उपकरणे बसवल्यामुळे गाडीचे रिअल-टाइम लोकेशन या ॲपद्वारे ट्रॅक करता येते.
( हेही वाचा : लवकरच हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार )
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुलभ करणे हा यात्री ॲपचा उद्देश आहे. यात्री अॅप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांना रेल्वे विषयीची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. मेगाब्लॉकमुळे रेल्वेसेवा विस्कळीत होणे, ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्यांची माहिती प्रवाशांना यात्री या अॅपद्वारे मिळते. त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणावर यात्री अॅपचा वापर करत आहेत. आता नव्या अपडेटनुसार प्रवाशांना जवळपासची स्थानकेही एक्सप्लोर करता येणार आहेत. सर्च ए टू बी फीचरमध्ये आता ‘मागील’ आणि ‘पुढील’ गाड्या शोधून प्रवासाचे नियोजन करता येईल. ही सुविधा मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईनच्या लोकल ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. मध्य रेल्वेचे अधिकृत मुंबई लोकल ॲप, Android आणि IOS वर ‘यात्री ॲप’ प्ले स्टोअर/अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.
यात्री अॅपची वैशिष्ट्ये
1. थेट अपडेट मिळतात
2. लोकल ट्रेन्सचे अपडेट केलेले वेळापत्रक
3. उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील
4. स्त्रोत आणि गंतव्य स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन
5. मेल एक्सप्रेस ट्रेनची माहिती जसे की “स्पॉट तुमची ट्रेन” आणि “पीएनआर स्थिती”
6. मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानकनिहाय सुविधा पाहणे
7. रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक
8. आवडत्या (नियमित) गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे
9. एका टॅपमध्ये SOS साठी रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे
10. मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक