महापालिकेच्या शाळेत शहरी शेती; कॅनडाच्या दूतावसाने घेतली दखल

130

पर्यावरणाबाबत संवेदनशीलतेचे धडे देण्यासाठी गत वर्षभराच्या कालावधीत माटुंग्याच्या एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाशी संवेदनशील उपक्रमाची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. शाळेतील नर्सरी आणि पर्यावरणाशी संबंधित शहरी शेतीच्या पुढाकाराची दखल आता कॅनडाच्या दुतावासानेही घेतली आहे. माटुंग्याच्या एमपीएस एल. के. वाघजी केंब्रिज शाळेने पर्यावरणासाठी मुलांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणूनच चर्चेचा विषय ठरत आहे.

पर्यावरणीय बदलांबाबतचे शिक्षण हे केवळ पुस्तकी मर्यादित न ठेवता या शिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात वापर करण्यासाठीचे धडे महानगरपालिकेच्या माटुंगा स्थित एल. के. वाघजी केंब्रिज शाळेचे विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातच घेत आहेत. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाशी संवेदनशील उपक्रमाची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. पर्यावरणाबाबत संवेदनशीलतेचे धडे देण्यासाठी गत वर्षभराच्या कालावधीत माटुंग्याच्या एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या १५४ मुलांच्या सहभागातूनच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीची संकल्पना राबवण्यात आली. त्यासोबतच शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. या सर्व पुढाकाराची दखल घेऊनच कॅनडाच्या भारतातील दुतावासाचे अधिकारी मायकल यांनी माटुंग्याच्या शाळेला भेट दिली. या प्रकल्पाची माहिती समजून घेतानाच विद्यार्थ्यांनी राबवलेल्या संकल्पनांचेही त्यांनी कौतुक केले. ग्रीन स्कूल या पुढाकार अंतर्गत शहरी शेतीचे शिक्षण आणि पर्यावरणासाठीच्या संवेदनशीलतेसाठी प्रोजेक्ट मुंबईच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास पाच देशांनी या शाळेसोबत करारही केला आहे. गत वर्षभरात शाळेने अमेरिका, ब्राझिल, बेल्जिअम, टर्की, युक्रेन यासारख्या देशांसोबत पर्यावरणीय विषयांसाठीचा करार केला आहे. पर्यावरणीय समतोलासाठी इतर देशात काय संकल्पना आणि प्रकल्प राबवले जातात यासारख्या गोष्टी समजावून घेणे हा कराराचा भाग आहे. महानगरपालिकेच्या केंब्रिज शाळेकडून झाडांनाही संवेदना असते ही संकल्पना शेअर केली आहे. त्यामुळे फक्त झाडे लावून उपयोग नाही. तर झाडांच्या संवेदना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज या संकल्पनेच्या माध्यमातून शेअर करण्यात आली.

मागील वर्षभर सुरू असलेल्या प्रकल्पात पर्यावरणीय बदल हे मुलांपर्यंत पोहोचवायला हवेत, या उद्देशानेच प्रयत्न करण्यात आले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांना या विषयांचा आगामी कारकीर्दीमध्ये फायदा व्हावा. त्याअनुषंगानेच शाळेच्या अभ्यासक्रमातही पर्यावरण विषयाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना यादव यांनी दिली.

शहरी शेती अंतर्गत लावली १०० झाडे

शहरी शेती या संकल्पनेचा भाग म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागातून तब्बल १०० झाडे ही शाळेच्या परिसरात लावण्यात आली आहेत. त्यामध्ये तुळस, कोरफड आणि फुलझाडांचाही समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे या झाडांसोबत नाते आहे. महत्वाचे म्हणजे हे विद्यार्थीच झाडांची काळजी घेतात. झाडांच्या संवेदना जाणून घेतानाच विद्यार्थ्यांचा झाडांशी संवाद वाढवणे हा देखील उपक्रमाचा एक भाग आहे. त्यामुळे झाडांना स्पर्श करताना विद्यार्थ्यांची संवेदना वाढतानाच आता मुले झाडांशी बोलूही लागली आहेत, हे विशेष.

मूग, मटकी, मका, कोथिंबिरीची लागवड घरच्या घरी

किचन गार्डन या संकल्पनेत पालकांचे वेगवेगळे गट करण्यात आले आहेत. या उपक्रमात मूग, मटकी, मका, कोथिंबिरीची लागवड घरच्या घरी करण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अशी कडधान्ये आपण घरच्या घरीही उगवू शकतो, ही संकल्पना मुलांच्या मनात रूजवणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. त्यासोबतच कचऱ्याचे वर्गीकरण करणे, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट यासारख्या संकल्पनाही शालेय पातळीवर राबवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांपासून ते समाजापर्यंत संकल्पना पोहचवण्यासाठीचा हा पुढाकार आहे.

सेंद्रिय खताची संकल्पना

महत्वाचे म्हणजे सेंद्रीय खताची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगतानाच विद्यार्थ्यांपासून ते समाजापर्यंत ही संकल्पना रूजवण्यात आली. दररोजच्या दुधाच्या पिशवीत सेंद्रीय खत तयार करून त्याचा वापर ‘किचन गार्डन’ या संकल्पनेसाठी करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांनाही सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे एरवी शेतीपासून अलिप्त राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजावून सांगणे. त्यामध्ये पर्यावरण आणि शेती यासारख्या क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवून या क्षेत्रात कारकीर्दीसाठी त्यांचे मन वळवणे, हादेखील उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणूनच प्राथमिक अवस्थेतच पर्यावरणात घडणाऱ्या बदलांसाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

(हेही वाचा – अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तांची घेतली ‘या’ कारणासाठी भेट!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.