- ऋजुता लुकतुके
अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसरं पर्व सुरू होत आहे. जानेवारी २०२५ मध्ये ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतील. पण, त्यानंतर त्यांची कारकीर्द तितकी सोपी असणार नाही. कारण, अमेरिकेत पुन्हा एकदा कर्जाची दरडोई मर्यादा गगनाला भिडत आहे. सध्या राष्ट्रीय कर्ज ३६ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या वर गेलं आहे आणि दरडोई कर्ज हे १ लाख अमेरिकन डॉलरच्या वर पोहोचलं आहे. जो बायडेन यांच्या कार्यकाळात ९ ट्रिलियन अमेरिकन डॉलरने हे कर्ज वाढलं. त्यामुळे आता कर्जाचं संकट पुन्हा एकदा आवासून उभं राहिलं आहे आणि ट्रम्प यांच्यावर अध्यक्षाच्या खुर्चीत बसल्यावर पहिली समस्या कर्जाचीच असणार आहे. (US Financial Crisis)
गेल्या आठवड्यात, ट्रेझरी विभागाने अमेरिकेच्या थकित कर्जाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज ३६ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. तर जून २०२४ मध्ये अमेरिकेवर ३५ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. म्हणजे अवघ्या चार महिन्यांत कर्जाचा बोजा एक ट्रिलियन डॉलरने वाढला आहे. अमेरिकेचे कर्ज दरवर्षी ३ ट्रिलियनने वाढत आहे. अमेरिकेवर असलेल्या कर्जाच्या या आकडेवारीनुसार प्रत्येक अमेरिकन नागरिकावर एक लाख डॉलर कर्जाचा बोजा आहे. (US Financial Crisis)
(हेही वाचा – Veer Savarkar : अंदमान आणि राजबंदीवानांचे पुतळे)
अमेरिकेवर मोठा कर्जाचा डोंगर झाला आहे. अमेरिका कर्जाच्या जाळ्यात अडकल्यामुळे दरवर्षी तिथल्या सरकारला एक ट्रिलियन डॉलर्सचे व्याज द्यावे लागते. जे संरक्षण, पायाभूत सुविधा, शिक्षण, गरिबी निर्मूलन कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा आणि मेडिकेअरवर अमेरिकन सरकारच्या खर्चापेक्षा जास्त आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढला असे नाही. जेव्हा बायडेन सरकार सत्तेवर आले तेव्हा अमेरिकेवर २६.९ ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते. त्यांच्या कार्यकाळात कर्जाचा बोजा ९ ट्रिलियन डॉलरने वाढला आहे. ट्रम्प जेव्हा शेवटचे सत्तेवर आले तेव्हा अमेरिकेवर १९ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. त्यांनी मागील कार्यकाळात कर्ज कमी करण्याचे आश्वासन दिले होते पण ते वाढले. यापूर्वीच्या अनेक सरकारांनी केलेल्या फालतू खर्चामुळे अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. (US Financial Crisis)
अमेरिकेची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेवर सध्याचा कर्जाचा बोजा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या वर्षी दिसला होता. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे अमेरिकन सरकारला आपल्या अर्थसंकल्पात व्याजाच्या पेमेंटसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. त्याचबरोबर सरकारला आपल्या नागरिकांवर अधिक कर लादावे लागतील. त्याचवेळी, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या इतर देशातील नागरिकांना हद्दपार करण्याची जी घोषणा केली होती, ती अंमलात आणल्यास अमेरिकेचे कर्ज संकट अधिक गडद होऊ शकते. कारण हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतील. कर्जाच्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन सरकारला बजेटमध्ये ८ ट्रिलियन डॉलर्सच्या खर्चात कपात करावी लागेल, तरच अमेरिका कर्जाच्या संकटातून बाहेर पडू शकेल. (US Financial Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community