- ऋजुता लुकतुके
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाने ८०,००० चा टप्पा ओलांडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही २४,४०० चा टप्पा पुन्हा एकदा पार केला. मागच्या पंधरा दिवसांची मरगळ शेअर बाजारांनी बुधवारी मागे टाकली. निफ्टीमध्ये तर २८५ अंशांची वाढ पाहायला मिळाली. तर सेन्सेक्सही ९०१ अंशांनी वधारला. दोन्ही निर्देशांकांमध्ये सव्वा टक्कयांची वाढ झाली. (US Presidential Election 2024)
फक्त भारतातच नाही तर जगभरातील शेअर बाजारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीचं स्वागत केलं आहे. सकारात्मक जागतिक संकेतांदरम्यान बुधवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ शेअर हे सुरुवातीपासून हिरव्या रंगात होते. फक्त ८ शेअरमध्ये मामुली घसरण होती. ट्रम्प यांची निवड हा शेअर बाजारांसाठी मार्केट बाँब असल्याचं वर्णन केलं जात आहे. कारण, तज्ञांच्या मते इथून पुढील काही दिवस शेअर बाजार सकारात्मक असतील. (US Presidential Election 2024)
अमेरिकेतील कोणत्याही आंदोलनाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतो, मग तो निवडणुकांबाबत असो वा यूएस फेडचे निर्णय असो. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले. निवडणुकीच्या निकालात डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यास भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येईल, असा अंदाज जागतिक ब्रोकरेज आधीच वर्तवत होते. निवडणुकीच्या निकालांमध्येही हे दिसून आले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तुफान वाढ झाली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जागतिक ब्रोकरेज फर्म एम्की ग्लोबलने अमेरिकन निवडणुकांसंदर्भात जारी केलेल्या आपल्या अहवालात असा अंदाज वर्तवला आहे की जर ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाले तर काही दिवस भारतीय बाजारात तेजी पाहायला मिळू शकते. (US Presidential Election 2024)
मंगळवारच्या शेवटच्या सत्रातच भारतीय शेअर बाजारातील तेजी दिसून आली होती. शेवटच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८,५४२ च्या पातळीवर उघडला आणि व्यवहारादरम्यान तो ७९,५२३ च्या पातळीवर गेला. मात्र, बाजार बंद होताना ६९४ अंकांच्या मजबूत वाढीसह ७९,४७६ च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय २३,९१६ च्या पातळीवर उघडल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अखेर २१७ अंकांच्या वाढीसह २४,२१३ च्या पातळीवर बंद झाला होता. आता या आठवड्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तसंच बँकांना चांगली मागणी असेल असा अंदाज आहे. (US Presidential Election 2024)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमयुक्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी-विक्रीचे सल्ले देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community