शौचालयाने उजळला परिसर!

बीपीटी शौचालयाप्रमाणे कोळसाबंदर, रेतीबंदर, इंदिरानगर, पारशीवाडा, जयभीम नगर, गिरीनगर, शिवडी कोळीवाडा, शिवडी गाडीअड्डा, फॉलबेरी रोड आदी भागांमध्येही शौचालय उभारले जात आहे, तिथेही अशाचप्रकारे प्रकल्प राबवून विभागातील रस्त्यांवर प्रत्येकी दहा दिवे बसवले जाणार आहे.

130

जनतेला शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून होता. परंतु हे शौचालय परिसराला प्रकाशमय करू शकतात, विभागाला उजळून टाकू शकतात, हे शिवडीतील शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी दाखवून दिले. पडवळ यांनी महापालिकेच्या निधीतून बांधलेल्या शौचालयावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवला आणि या प्रकल्पातील विजेमुळे शिवडी पूर्व येथील ज्या अमन शांती रोडवर संध्याकाळी सातनंतर जो अंधार पसरायचा, तो दूर करून हा परिसराच उजळून टाकला.

New Project 4 8

सौरऊर्जा प्रकल्पातून १० स्ट्रीट लाईट पेटवल्या!

मुंबईत सध्या महापालिकेच्यावतीने २२ हजार शौचकुपांचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामांतर्गत शिवडीतील प्रभाग क्रमांक २०६ मध्ये १२ ते १३ शौचालयांची उभारणी केली जात आहे. यातील शिवडी पूर्व येथील अमन शांती रोड व रामगड येथील शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातील अमन शांती रोडवरील शौचालयाचे लोकार्पणही करण्यात आले आहे. परंतु हे शौचालय नसून परिसरातील नागरिकांचे आजवरचे अंधारमय जीव उजळून टाकणारे असे हे शौचालय ठरले आहे. या शौचालयाची बांधणी करताना स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापालिकेचे परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय बालमवार आणि एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त यांच्या प्रयत्नाने याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प राबवला. ज्याद्वारे वीज निर्मितीतून आसपासचा रस्ता प्रकाशमय झाला आहे. या वीज निर्मितीतून १० स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे विभागातील ४०० घरांच्या वस्त्यांना या रस्त्यांवर ये-जा करताना संध्याकाळी सात नंतर अंधाराची भीती वाटणार नाही.

New Project 7 7

(हेही वाचा : मुंबईतील ऑक्सिजन प्लांटचे कंत्राट दुप्पट दराने! भाजपची चौकशीची मागणी)

बीपीटी शौचालय ‘पॅटर्न’ बनले!

स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा संपूर्ण परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टचा अखत्यारितील आहे. याठिकाणी बेस्टचे विजेचे खांब नाही. बीपीटी कधीही याला परवानगी देत नाही. त्यामुळे या शौचालयावर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. ही संकल्पना परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी तयारी दर्शवली. त्यानुसार पहिला प्रकल्प या शौचालयावर उभारला असून आजवर ज्या रस्त्यांवर संध्याकाळी सात नंतर अंधार असल्याने कुणी जायला तयार नसायचे, त्या अमन शांती रोडवर १० पथदिवे बसवण्यात आले. त्यामुळे हा परिसर लख्ख प्रकाशाने न्हाऊन निघाला आहे. अशाचप्रकारे कोळसाबंदर, रेतीबंदर, इंदिरानगर, पारशीवाडा, जयभीम नगर, गिरीनगर, शिवडी कोळीवाडा, शिवडी गाडीअड्डा, फॉलबेरी रोड आदी भागांमध्येही शौचालय उभारले जात आहे, तिथेही अशाचप्रकारे प्रकल्प राबवून विभागातील रस्त्यांवर प्रत्येकी दहा दिवे बसवले जाणार आहे. बीपीटीच्या परिसरात बेस्टला पथदिवे बसवण्यास परवानगी मिळत नसल्याने महापालिकेच्या निधीतून हा प्रकल्प रावबण्यात येत असल्याचे ते सांगतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.