उत्तरप्रदेश राज्यात गेल्या २४ तासात २,५०० पेक्षा जास्त मशिदी आणि मंदिरे यांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. राज्यातील कानपूर, लक्ष्मणपुरी, गोरखपूर, संत कबीरनगर, आझमगड, पीलीभीत आणि कानपूर येथे मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली. ६ डिसेंबरला पहाटे ४ वाजल्यापासून विनापरवानगी लावण्यात आलेल्या, तसेच प्रमाणापेक्षा अधिक आवाज असणार्या भोंग्यांवर कारवाईला प्रारंभ करण्यात आला. या संपूर्ण कारवाईवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून लक्ष ठेवण्यात येत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर कारवाई
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ४ डिसेंबरला ऑनलाईन बैठक घेऊन पोलिसांना विनापरवानगी भोंग्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचा आदेश दिला होता. तसेच त्यापूर्वी मंदिर आणि मशीद यांच्या संबंधितांना भेटून स्वतःहून ते हटवण्यास सांगण्याची सूचना केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
मौलानांचा विरोध
कानपूर येथे पोलिसांनी २४ घंट्यांत ५४ भोंगे हटवले. यावर मौलानांंनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, नियमानुसार लावण्यात आलेले मशिदींवरील भोंगेही काढण्यात आले. त्या संदर्भात आधी नोटीसही देण्यात आली नाही. आम्ही दिवसातून ५ वेळा प्रत्येकी ५ मिनिटांपेक्षा कमी वेळ त्यांचा वापर करत असतांनाही कारवाई केली जात आहे.
शहर काझी (इस्लामी कायदेतज्ञ आणि न्यायाधीश) हाफिज अब्दुल कुद्दूस हादी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ते म्हणाले की, यापूर्वीही जेव्हा पोलिसांनी मोहीम राबवली होती, तेव्हा सर्व काही मानकांनुसार करण्यात आले होते. जर भोंगे नियमानुसार असतील, तर ते काढू नयेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community