सध्या उत्तराखंड येथे जोशी मठ परिसरातील घरे खचत चालली आहेत. या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची केंद्र सरकारने अखेर दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकार झाले सक्रिय
याबाबत मुख्यमंत्री धामी यांनी स्वतः ही माहिती दिली. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरात जमीन खचण्याच्या आणि अनेक ठिकाणी घरांना तडे गेल्याच्या घटनांनंतर पंतप्रधान कार्यालयाने रविवार, ८ जानेवारी रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा कॅबिनेट सचिव, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या सदस्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जोशीमठ जिल्हा प्रशासन आणि उत्तराखंड सरकारचे वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आदल्या दिवशी जोशीमठला जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. याच्या एक दिवस आधी त्यांनी सुमारे 600 बाधित कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री धामी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बाधित लोकांच्या मदत आणि बचावासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. 20 हजार लोकवस्तीच्या या गावात 500 घरांना अशा मोठ्या भेगा पडल्यात.