मुंबईत ४५ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण ३ मे रोजी बंद

ज्यांची कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेली आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.

कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय, महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवार दिनांक ३ मे २०२१ रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नाही. तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे निर्देशित ५ केंद्रांवर सुरू राहील. ज्यांची कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेली आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रांवर येऊ नये. महापालिका प्रशासन लस उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून, लसींचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर येऊन गर्दी करू नये, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लस!)

साठा नसल्याने लसीकरण बंद

कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, मुंबई महापालिका, शासन यांच्यातर्फे ६३ केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे महापालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रांत सोमवार, ३ मे २०२१ रोजी ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार नाही.

इथे होणार लसीकरण

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे, मुंबई महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक ३ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत हे लसीकरण सुरू राहील. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

  1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
  2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
  3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
  4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
  5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here