१८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला लागणार ब्रेक?

४५ पेक्षा जास्त वयोगटातील पाच लाख नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामुळे आता १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी वापरण्यात येतील.

99

महाराष्ट्रात लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा ६ लाखांच्या खाली आला आहे. रिकव्हरी रेट ८७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ८४ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर ४५ पेक्षा जास्त वयोगटातील पाच लाख नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामुळे आता १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी वापरण्यात येतील. त्यामुळे आता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

३ लाख रेमडेसिवीरची ऑर्डर

राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांना ३ लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. याशिवाय, म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यासाठी हाफकिन संस्थेला एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार आता मोफत उपचार! काय म्हणाले टोपे?)

नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री?

  • राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते.
  • सध्या राज्यात कोवॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या(कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत.
  • एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत.
  • कोविशिल्डचे देखील दुसरे डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचे आहेत.
  • महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस, केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्यातरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल.
  • ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात प्रयत्न केले जात असून, विविध जिल्ह्यांत ३०० पेक्षा जास्त पीएसए यंत्र खरेदीचे कार्यादेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
  • इथेनॉल प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग उस्मानाबाद येथील धाराशीव साखर कारखान्याने केला असून, या कारखान्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दररोज ४ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाली आहे. त्याद्वारे दररोज ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवता येतील.
  • राज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोशिएशनच्या माध्यमातून याबाबत मागणी करण्यात आली होती.
  • मधुमेह नियंत्रित नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून, या आजारावर प्रभावी ठरलेल्या इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकिनकडे मागणी नोंदवण्यात आली असून, निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रिया केली जाईल. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.