डबेवाला भवनासाठी लसीकरण केंद्र केले बंद : स्थानिकांमध्ये असंतोष

128

मुंबईत डबेवाला भवन उभारण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार हार्मोनी इमारतीतील समाजकल्याण केंद्राची जागा देण्यात येत आहे. त्यामुळे या प्रस्तावित जागेवर अर्थात हार्मोनी येथे सुरु असलेले लसीकरण केंद्र तात्काळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विभागात आता असंतोष निर्माण होत आहे.

एच पश्चिम विभागातील वांद्रे पश्चिममधील प्रभाग क्रमांक १०० मध्ये हार्मोनी येथे स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कोविड काळात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु आता हे लसीकरण केंद्र अचानक बंद करण्यात आले. मात्र, हे केंद्र बंद करताना याची कल्पना स्थानिक नगरसेविका म्हणून देण्यात न आल्याने भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या जागेवर डबेवाला भवन उभारण्यात येणार असल्याने हे लसीकरण केंद्र बंद करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

( हेही वाचा : शिवसेनेला पुन्हा सत्तेवर येण्याचा भीती की अतिआत्मविश्वास! )

स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण

एकीकडे कोविडमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणेसाठी जास्तीत जास्त निधी व शहरातील जागा उपलब्ध करुन देत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. अशावेळी ज्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे ते अचानक बंद करुन त्या जागेचा अन्य कोणत्याही कारणसाठी त्याचा वापर करणे योग्य ठरणार नाही. एच-पश्चिम विभागात अशा आरोग्य यंत्रणेसाठी अत्यल्प जागा शिल्लक आहेत. त्यामुळे उपलब्ध जागांमधून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी अपेक्षा असताना हार्मोनी येथील केंद्र अचानक बंद करुन नागरीकांची गैरसोय करण्याची भूमिका मुंबई महापालिकेने घेतल्याने स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मुळात ही जागा समाजकल्याण केंद्रासाठी राखीव असून, स्थानिकांना त्या जागेचा योग्य कारणास्तव वापर व्हावा असे आरक्षणाचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे साथीच्या आजारात ही जागा आरोग्य यंत्रणेसाठी देऊन जो समाजोपयोगी निर्णय घेण्यात आला तो अचानक का बदलण्यात आला? असा सवाल स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.

आयुक्तांकडे निवेदन

मुंबईच्या डबेवाल्यांची किर्ती ही जगभर असून त्यांचे भवन मुंबईत व्हावे ही अत्यंत योग्य व सन्मानाचीच कल्पना आहे. त्यामुळे डबेवाला भवन उभारण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र त्यासाठी योग्य जागेची निवड करण्यात यावी, स्थानिकांना विचारात घेऊन, जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन असे निर्णय होणे अपेक्षित आहे. डबेवाला भवन उभारण्यासाठी प्रशस्त जागेसह स्वतंत्र वास्तूचीही गरज असते. परंतु समाजकल्याण केंद्राच्या अपुऱ्या जागेत डबेवाला भवन बनवणे हे योग्य ठरणार नाही. डबेवाल्यांच्या भावनेशी खेळण्यासारखा हा प्रकार असून प्रशासनाने डबेवाला भवनासाठी प्रशस्त व मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. डबेवाला भवनासाठी येथील लसीकरण केंद्र बंद केल्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे जनआंदोलनही उभे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डबेवाल्यांचीही उपेक्षा होईल. त्यामुळे लादण्यात आलेल्या या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, स्थानिक लोकभावनेचा व डबेवाल्यांच्या किर्तीचाही आदर करावा अशी विनंती म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे सुरेश काकाणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.