मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही कोरोनाचा संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, शीव रुग्णालयामधील लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. शीव रुग्णालयातील लसीकरण केंद्र हे अपघात विभागाच्या अगदी जवळच्या वॉर्डातच असल्याने याठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यातच अपघाती रुग्णांची अवस्था पाहून नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती लक्षात घेता, नागरीकांच्या तक्रारींनुसार तसेच स्थानिक नगरसेविकेने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांबरोबर सामोपचाराने चर्चा करत, लसीकरण केंद्र अन्य जागेत हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता शीव रुग्णालयातील लसीकरण केंद्र हे समोरील लिटिल एंजल शाळेत हलवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशस्त मोकळ्या जागेतील या केंद्रात लस घेता येत असल्याने, नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अपु-या जागेमुळे होत होती गर्दी
मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर एफ-उत्तर विभागातील शीव रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. पण हे लसीकरण केंद्र अपघात विभागाच्या बाजूच्या वॉर्डमध्ये सुरू करण्यात आले होते. या अपघात विभागात येणारे रुग्ण पाहून, लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हायची. तसेच लसीकरणाची जागा अपुरी असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाची भीतीही व्यक्त केली जात होती.
(हेही वाचाः कोविन पोर्टलवर नोंदणी करणा-यांसाठी महत्त्वाची सूचना… ८ मेपासून नोंदणीवेळी मिळणार नवा ‘कोड’!)
प्रशासनाने दाखवली तयारी
याबाबतच्या गैरसोयीच्या तक्रारी नागरिकांकडून स्थानिक नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांना प्राप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्यासमवेत नागरिकांसह शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनानेही तयारी दर्शवली. यासाठी शिरवडकर यांनी रुग्णालयाजवळीलच मानव सेवा संघाच्या मागील बाजूस असलेल्या, लिटिल एंजल स्कूलच्या जागेत लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागाच्यावतीने सर्व सुविधा प्राप्त झाल्यानंतर, दोन दिवसांपासून शीव रुग्णालयातील लसीकरण केंद्र नवीन जागेत सुरू झाले आहे.
नागरिकांच्या तक्रारी
शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. गर्दी मोठ्या प्रमाणात व्हायची. त्यामुळे आमच्याकडे काही तक्रारी येत होत्या. स्थानिक नगरसेविकेकडेही अशा तक्रारी होत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्र लिटिल एंजल स्कूलच्या जागेत हलवण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याठिकाणी दरदिवशी एक हजार नागरिकांचे लसीकरण व्हायचे.
(हेही वाचाः कोविड सेंटर की चोरांचा अड्डा? रुग्णाचा मोबाईल, पैसे झाले छुमंतर)
शीव रुग्णालयातील केंद्राच्या जागेपेक्षा ही जागा प्रशस्त आणि मोकळी आहे. मागील अनेक दिवसांपासूनची आमची मागणी होती. त्यामुळे हे केंद्र नवीन जागेत सुरू केल्याबद्दल शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, सर्व परिचारिका, सर्व सुरक्षा रक्षक, शाळेचे विश्वस्त अनिल आचार्य या सर्वांचे शिरवडकर यांनी आभार मानले आहेत.