आता डॅडींच्या दगडी चाळीतही घेता येणार कोरोना लस

लसीकरणाच्या माध्यमातून दगडी चाळ शेवटची पाहून घेण्याची संधी विभागातील जनतेला मिळाली आहे.

भायखळा येथील अरुण गवळी यांच्या दगडी चाळीच्या पुनर्विकासाची जोरदार चर्चा सुरू असतानाच, कोरोना आजारांमधील रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे एकेकाळी या दगडी चाळीची भीती वाटणाऱ्यांना आता याच ठिकाणी जाऊन कोरोनाची प्रतिबंधक लस घेता येणार आहे. नवरात्रोत्सवानंतर या चाळीत पुन्हा एकदा लसीकरणासाठी गर्दी दिसून येणार आहे.

गीता गवळी यांचा प्रस्ताव

अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता अजय गवळी यांच्या प्रयत्नाने आणि महापालिका ई विभागाच्या संयुक्त विद्यमाने दगडी चाळ कोरोना लसीकरण केंद्राचे लोकार्पण अखिल भारतीय सेनेच्या आशा गवळी यांच्या हस्ते पार पडले. मुंबईतील प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत असून, यासाठी शालेय इमारत, समाजकल्याण हॉल, आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह तसेच रुग्णालय याठिकाणी हे लसीकरण केंद्र सुरू केले जात आहे. परंतु अ.भा.से.च्या नगरसेविका गीता गवळी यांनी आपल्या प्रभागात दगडी चाळीतील मोकळ्या जागेतच हे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला आणि महापालिकेच्या मदतीने हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

(हेही वाचाः घरोघरी लसीकरण करण्याची महापालिकेने तयारी करावी! उच्च न्यायालयाचे निर्देश )

दगडी चाळीची आठवण राहण्यासाठी

आजवर लोकांच्या मनामध्ये दगडी चाळी विषयी भीती आहे. मात्र, लोकांना दगडी चाळ पाहण्याची उत्सुकताही तेवढीच असते. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्यांच्या नजरा दगडी चाळीला शोधत जात असतात. दगडी चाळीत दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दगडी चाळ पाहण्याची इच्छा अनेकांची असते. अरुण गवळी यांचे वास्तव्य असलेल्या या दगडी चाळीचा दरारा आहे. मात्र, या दगडी चाळीच्या पुनर्विकासाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा असताना आता या वास्तूत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्विकासामध्ये दगडी चाळीची जुनी ओळख संपून जाणार असल्याने, लसीकरणाच्या माध्यमातून दगडी चाळ शेवटची पाहून घेण्याची संधी विभागातील जनतेला मिळाली आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

नागरिकांना लस घेण्याचे आवाहन

यावेळी महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे, ई विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर, विभागाचे कार्यकारी अभियंता अभय जगताप, विभागाचे आरोग्य अधिकारी शैलेंद्र गुजर, सहाय्यक अभियंता दिपक झुंजारे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा सानप, डॉ. शैलेश पोळ, दुय्यम अभियंता सचिन सोनावणे, कनिष्ठ अभियंता किशोर जगदाळे आदींचे गीता गवळी यांनी विशेष आभार मानत, विभागातील नागरिकांनी नोंदणी करुन या लसीकरण केंद्रावर लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here