आता कोविन-ॲप नोंदणीनुसारच लसीकरण

'कोविन ॲप' किंवा 'कोविन पोर्टल' यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर 'अपॉइंटमेंट स्लॉट' मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय, महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

116

लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी ज्या नागरिकांची ‘कोविन ॲप’वर नोंदणी झालेली आहे, तसेच ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर मिळालेल्या ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ नुसारच लसीकरण करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी दिले आहेत.

लसीकरणावेळी सोशल डिस्टंन्सिंगचा उडतो फज्जा

मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण हे दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून नियमितपणे राबवण्यात येत आहे. यासाठी महापालिका क्षेत्रात साधारणपणे १४७ लसीकरण केंद्रे ही लसींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत. पण गेले काही दिवस मुंबईतील विविध लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी योग्यरित्या करणे कठीण होऊ शकते. यामुळे आता केवळ ‘कोविन ॲप’ किंवा ‘कोविन पोर्टल’ यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय, महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश गुरुवारी आयुक्तांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

(हेही वाचाः गरीब, मध्यमवर्गीयांच्या मोफत लसीकरणासाठी भाजपचा ‘हा’ पर्याय)

कोवॅक्सिनच्या पहिल्या प्रमाणपत्राच्या आधारे दुसरा डोस

वय वर्ष ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे ‘हार्ड कॉपी’ किंवा ‘सॉफ्ट कॉपी’ स्वरुपात सादर केल्यानंतर, लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. आरोग्य कर्मचारी(हेल्थ केअर वर्कर) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी(फ्रंटलाईन वर्कर) यांच्याबाबत ज्यांना कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसींचा दुसरा डोस घ्यायचा असल्यास, अशा व्यक्तींच्या बाबत त्यांच्या नियोक्त्याने अधिकृतपणे प्रमाणित केलेले निर्धारित नमुन्यातील पत्र याची पडताळणी केल्यानंतरच, लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.