जे नागरिक आजारपणासह शारीरिक/ वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिकांनी [email protected] या ई-मेल आयडीवर संपूर्ण माहिती पाठवावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लसीकरणासाठी महापालिकेची सुविधा
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह मुंबई महापालिकाही प्रयत्नशील आहे. ही लस घेऊ इच्छिणारे पात्र नागरिक लसीकरण केंद्रांवर येतात. नागरिकांसाठी लसीकरण केंद्रांवर वेगवेगळ्या सुविधा देखील दिल्या जातात, जेणेकरुन लसीकरण सुलभरित्या पार पडावे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणा सारखे उपक्रमही महापालिकेने राबवले आहेत.
(हेही वाचाः दुकान बंद केले नाही म्हणून पोलिसाने केली मारहाण!)
महापालिकेचे आवाहन
आजारपणासह शारीरिक/ वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळून आहेत, असेही अनेक नागरिक आहेत. अशा व्यक्तींना कोविड लस देता यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सर्व मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणा-या(bedridden) व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करायचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक (contact number), अंथरुणास खिळून असण्याचे कारण, इत्यादी माहिती [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावी. जेणेकरुन अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करणे सोईचे जाईल, असे आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community