शुक्रवारी पुरुषांना लसीकरण केंद्रांवर नो एन्ट्री: का ते जाणून घ्या

ह्या विशेष सत्राच्या कारणाने शुक्रवारची ऑनलाईन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

132

महापालिकेने मागील काही दिवसांमध्ये दुसऱ्या लसीकरणावर भर दिलेला असताना, महिलांचे जलद लसीकरण करण्यावर महापालिकेने आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आता महिलांच्या लसीकरणासाठी महापालिकेने दिवस निश्चित केला असून, त्यादिवशी पुरुषांना या लसीकरणासाठी नो एन्ट्री असणार आहे. येत्या शुक्रवारी मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. ह्या विशेष सत्राच्या कारणाने शुक्रवारची ऑनलाईन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

महिलांसाठी विशेष सत्र

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महापालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० ह्या वेळेत राबवले जाणार आहे.

(हेही वाचाः मुंबईतील कोविडचा ताप या बुधवारीही पाचशेपार)

वॉक इन लसीकरण

मुंबईतील सर्व २२७ निवडणूक प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महापालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रांवर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने, शुक्रवारसाठीची ऑनलाईन नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.