सोमवार महिलांचा, मंगळवार शिक्षक व विद्यार्थ्यांचा… मग चला लसीकरणाला

या दोन्ही दिवशी मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन(वॉक इन) पात्र नागरिकांना लस घेता येईल.

142

मागील आठवड्यात महिलांसाठीच्या लसीकरणाचे पहिले सत्र घेणाऱ्या महापालिकेने आता येत्या सोमवारी पुन्हा एकदा केवळ महिलांसाठीच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक कोविड लसीकरण केंद्रांवर सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी फक्त महिलांचे लसीकरण होणार आहे. तर महिलांबरोबरच महापालिकेने विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी २८ सप्टेंबर २०२१ रोजी फक्त विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी सकाळच्या सत्रात पहिला डोस तर दुपारच्या सत्रात दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेनुसार पात्र लाभार्थ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अशा आहेत लसीकरणाच्या वेळा

कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड लसीकरण केंद्रांवर, सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. तसेच, मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात येईल. याच दिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत, दुसरा डोस बाकी असणाऱ्या पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.

(हेही वाचाः कोविडवरील उपचारासाठी अँटीबॉडीज कॉकटेलला मान्यता! काय आहे ही उपचार पद्धत?)

ही कागदपत्रे आणणे आवश्यक

या दोन्ही दिवशी मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन(वॉक इन) पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना शासकीय ओळखपत्र(आधार कार्ड इ.) आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे. महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिला किंवा पहिला डोस घेऊन आवश्यक तो कालावधी(कोविशिल्‍डसाठी पहिल्या डोसनंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सिनसाठी पहिल्या डोसनंतर २८ दिवस) पूर्ण झाला असेल दुसरा डोसही घेता येईल. दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना, पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत आणणे आवश्यक असेल.

महापालिकेकडून आवाहन

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महापालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी सदर सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे.

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.