Vaishvik Hindu Rashtra Mahotsav: हिंदुत्वनिष्ठांची पंढरी : वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

46
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav: हिंदुत्वनिष्ठांची पंढरी : वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav: हिंदुत्वनिष्ठांची पंढरी : वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
  • नित्यानंद भिसे

वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशन म्हणजे हिंदू संघटनांसाठी ऊर्जाकेंद्र, हिंदुत्ववादी संघटनांचा मेळावा, हिंदुत्वावरील आघातांवरील उत्तरे अशी अनेक विशेषणे देता येतील. मागील १२ वर्षांपासून गोवा येथे श्री रामनाथ देवस्थान येथे हे अधिवेशन पार पडते. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही या अधिवेशनाला देश-विदेशातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहिले. मागील तीन वर्षांपर्यंत हे अधिवेशन अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन म्हणून भरवले जात होते. मात्र आता यात सहभागी होणाऱ्या संघटना विदेशातीलही आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ‘लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मनोधर्य खचले आहे, मात्र हे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव (Vaishvik Hindu Rashtra Mahotsav) या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा कमी झालेला विश्वास वाढवणारे आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले. याचा प्रत्यक्ष अनुभव या अधिवेशनात घेता येत आहे.

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संघटित भावना वाढली

जशी वारकरी बांधवांसाठी पंढरीची वारी पवित्र असते, अगदी तसाच भाव या अधिवेशनात दरवर्षी सहभागी होणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांचा बनला आहे. त्यामुळे महिना-दोन महिने आधीपासूनच देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवेशनाचे दिनांक जाणून त्यांचे पुढील नियोजन करत असतात. अत्यंत नियोजनबद्धपणे या अधिवेशनाची पूर्वतयारी, त्यानंतर प्रत्यक्ष अधिवेशन असे किमान ६०-७० दिवस तरी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक कार्यरत असतात. अत्यंत नियोजनबद्धपणे अधिवेशनातील एक-एक दिवस पुढे सरकत असतो, दररोज नवीन शे-दोनशे हिंदुत्वनिष्ठ संघटना या अधिवेशनात सहभागी होत असतात. देशभरात कानाकोपऱ्यात अनेक छोट्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत, ज्या मंदिर स्वच्छता, गड किल्ले संवर्धन, गोरक्षण, लव्ह जिहाद-धर्मांतराचा विरोध यांसाठी काम करत असतात. अशा संघटनांना या अधिवेशनात व्यासपीठ मिळते, त्या संघटनांची ओळख देशातील इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना होते. त्यांच्याशी समरस होत असल्याने सर्वांचेच बळ वाढते. (Vaishvik Hindu Rashtra Mahotsav)

(हेही वाचा – Ashadhi wari 2024: ज्ञानोबा-तुकोबारायांची पालखी पुण्यात मुक्कामी)

हिंदुत्वनिष्ठांच्या कार्याचा गौरव

सध्या हिंदुत्वविरोधी नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रघात डाव्यांनी आणि तथाकथित निधर्मी संघटनांनी पाडला आहे. त्यामुळे हिंदू धर्म आणि हिंदुत्वाची अपरिमीत हानी होत आहे. वैचारिक पातळीवर होणारा हा आघात परतवून लावणे यासाठी ब्रेन स्ट्रॉमिंग होणे अत्यंत आवश्यक असते. या अधिवेशनात हे ब्रेन स्ट्रॉमिंग होऊन त्यांना या आक्रमणावर प्रतिवाद करण्यासाठी उत्तरे मिळतात. या अधिवेशनात हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांचा सत्कार केला गेला. श्री काशी विश्वेश्वर मंदिर म्हणजे हिंदु धर्मियांचे सर्वांत मोठे श्रद्धास्थान आहे. या संदर्भात मंदिर मुक्तीसाठी मागील ४० वर्षे कायदेशीर मार्गाने संघर्ष करणारे सोहन लाल आर्य, कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी, अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता दीपक कुमार सिंग, यांसह माता शृंगारगौरीच्या पूजेच्या अधिकारासाठी याचिका करणाऱ्या सीता साहू आणि त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे यजमान बाल गोपाल साहू, याचिकाकर्त्या मंजू व्यास या सर्वांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार करण्यात आला. या अशा सत्कारांमुळे हिंदुत्वनिष्ठांचे मनोबल वाढते. त्याचबरोबर अन्य हिंदुत्वनिष्ठांमध्ये उत्साह वाढतो. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीरसह पूर्व भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना हिंदुत्वाचे कार्य करताना किती अडचणींना सामोरे जावे लागते, त्याची दखल या अधिवेशनात घेतली गेली. ज्यामुळे या संघटनांची एकटेपणाची भावना दूर होऊन त्यांच्यात संघटित भावना वाढली.

(हेही वाचा – Ashadhi wari 2024: ज्ञानोबा-तुकोबारायांची पालखी पुण्यात मुक्कामी)

मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी चर्चा

दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठांना हिंदी भाषा फारशी परिचित नाही, तरीही ते या अधिवेशनात आले. भारतातील अन्य भागातील हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्याशी बोलताना भाषेची अडचण आली नाही, उलटपक्षी त्यांच्यातील संघ भावनेने प्रेमभाव, जवळीकता निर्माण झाल्याचे दिसून आले. या महोत्सवात राज्यभरातील मंदिरांच्या समस्या निवारणासाठी, तसेच वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार मंदिरांचे संघटन उभारण्यात आले आहे. या माध्यमातून मंदिरांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात येत आहेत. तसेच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यभरातील सरकारच्या ताब्यात असलेल्या मंदिराचे सरकारीकरण बंद करण्यासाठीचा लढा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी गट चर्चेच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. तसेच मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी काय करावे, यावर चर्चा विनिमय झाले.

हिंदूंची इको सिस्टीम उभारली

याच अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्ववादी अधिवक्त्यांचे संघटन उभे झाले आहे. त्यांचे सत्रही घेण्यात आले. ज्यामध्ये हिंदुत्वावर होणारे आघात, हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर होणाऱ्या कायदेशीर कारवाया आदींबाबत कायदेशीर मदत पुरवण्याच्या दृष्टीने हिंदूंची एक इको सिस्टीम उभारणे या अधिवेशनामुळे शक्य झाले आहे. ज्ञानवापीसाठी लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन असो किंवा अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., अधिवक्ता खूश खंडेलवाल, अधिवक्ता विनित जिंदाल, अधिवक्ता राजीव कुमार नाथ, अधिवक्ता प्रकाश साळसिंगकर, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय असो, त्यांनी या अधिवेशनात उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांना विश्वास दिला. या अधिवेशनात वर्षभरासाठी किमान समान कृती कार्यक्रम ठरवण्यात आला. कोणत्याही राज्यात कोणत्याही एका संघटनेचे आंदोलन असेल, तर त्या संघटनेला इतर सर्व संघटनांनी सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यापुढे सर्वच लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची ताकद वाढणार आहे.

देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचा आवाज बुलंद करणारा आणि हिंदूसंघटनाद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने कालबद्ध वाटचाल करणारा वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हा देशभरातील हिंदूंसाठी आशेचा किरणच आहे, यात शंका नाही!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.