कोकणात लवकरच धावणार वंदे भारत!

मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, या मार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

( हेही वाचा : उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे ३ धक्के! जमीन हादरल्याने नागरिक भयभीत)

कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडण्यात आले. कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. कोकणातील रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.

`वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती अथवा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असावा, कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी, रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी, सावंतवाडी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी, रेल्वेमार्गालगत रेल्वेच्या जागेवर वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एसआरए प्रकल्पात पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे जमिनीचा एफएसआय द्यावा, कोकणातील लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव तयार करावा, वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे, जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा, आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here