महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ मध्ये महाराष्ट्र सरकारने घेतला. भारतामध्ये मराठी भाषिकांची संख्या ही तिसऱ्या क्रमांकावर असून हा दिवस साजरा करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : “आपण ‘मराठी एकत्र’ असू तर…” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंचे विशेष पत्र)
राज्यभरात विविध कार्यक्रम
- नवी मुंबईत मराठी राजभाषा दिनानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत असणार आहे.
- मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
- नाशिकमध्ये मराठी दिनानिमित्त ग्रंथ दिंडी. नाशिक मनपा, सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे.
- नव्या ३५ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी 27 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान” मुंबई येथे संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा प्रवास उलगडुन दाखविणारा सांगितीक कार्यक्रम “ऐसी अक्षरे रसिके” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ व भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.