मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेल्या माजी मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांना चेकमेट देण्याचे काम भाजपने शिंदे गटाच्या माध्यमातून केले आहे. आमदार वर्षा गायकवाड यांच्या अगदी जवळ असणारे माजी नगरसेवक बब्बू खान आणि स्वर्गीय माजी नगरसेवक नरेश पहेलवान यांचा मुलगा कुणाल माने आणि सून गंगा माने तसेच सिद्धिविनायक न्यासाचे विश्वस्त भास्कर शेट्टी यांच्यासह माजी नगरसेविक ज्योत्स्ना यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या मार्गामुळे गायकवाड यांना धारावीत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे वसंत नकाशे, टी जगदीश आणि मारीअल्लम थेवर असे तीन नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वकील शेख यांची पत्नी रेश्मा बानो, काँग्रेसच्या तिकिटावर बब्बू खान आणि गंगा कुणाल माने या निवडून आल्या होत्या, तर मनसेच्या तिकिटावर हर्षदा आशिष मारे या निवडून आल्या होत्या होत्या, मात्र पुढे मनसेतून पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळे धारावीत शिवसेनेचे एकूण चार नगरसेवक झाले. काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचे एक अशा प्रकारे एकूण सात नगरसेवक होते.
(हेही वाचा – Crop Compensation: पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मूग आणि बाजरी पिकाला नुकसानभरपाई मिळणार)
त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेची चांगल्या प्रकारे पकड होती. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना शिवसेनेचे उमेदवार आशिष मोरे यांनी कडवी लढत दिली. परंतु या शिवसेनेचे प्राबल्य असूनही आशिष मोरे यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि वर्षा गायकवाड या विजयी ठरल्या. शिवसेनेचे प्राबलय असूनही आशिष मोरे यांचा पराभव हा केवळ शिवसेनेतील दगा फटक्यामुळेच झाल्याची जोरदार चर्चा त्यावेळी ऐकायला मिळत होती. या विभागात शिवसेनेचे वर्चस्व वाढत असले तरी सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप हे एकत्र लढूनही आशिष मोरे हे निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या या मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे बोलले जाते. त्यामुळे धारावी मतदार संघातील गायकवाड घराण्याची ही मक्तेदारी संपुष्टात काढण्याच्या चंग भाजपने बांधला असला तरी भाजपकडे या मतदारसंघासाठी कोणताही उमेदवार नाही. त्यामुळे भाजपने या विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला बळ देण्याचे काम करत आहे.
एकेकाळी गायकवाड यांच्या अगदी जवळ असणाऱ्या परंतु सन २०१७च्या निवडणुकीत तिकीट नाकारल्याने वकील शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून आपल्या पत्नीला निवडून आणले. त्यामुळे त्यांच्यासह त्याच्या पत्नी माजी नगरसेविका रेश्मा बानो यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शनिवारी २६ ऑगस्ट रोजी गायकवाड यांचे खंदे समर्थक व अल्पसंख्यांक सेलचे प्रमुख बब्बू खान यांच्यासह माजी नगरसेविका गंगा माने यांनी प्रवेश केला. शीव विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त असलेले भास्कर शेट्टी व माजी नगरसेविका जोत्स्ना परमार यांच्यासोबत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे धारावीत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही माजी नगरसेवक शिल्लक राहिलेला नसून या मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे वसंत नकाशे, टी. जगदीश, हर्षदा मोरे आणि मारी अल्लम थेवर असे चार नगरसेवक राहिले आहेत.
त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी मानली जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याऐवजी काँग्रेसचे नगरसेवक फोडून मुंबईच्या अध्यक्षपदी असणाऱ्या वर्षा गायकवाड यांना हा एक प्रकारचा इशारा भाजपने शिवसेनेच्या माध्यमातून दिल्याचे बोलले जात आहे. मुंबईचे नेतृत्व करायला निघालेल्या वर्षा गायकवाड यांना स्वतःचेच नगरसेवक सांभाळता येत नाही, तर मुंबईतील काँग्रेसचे नेतृत्व काय करणार असा प्रश्न यामुळे उपस्थित करत भाजपने त्यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण त्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
या मतदारसंघात भाजपने यापूर्वीच शीव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तमिल सेल्वन यांच्याकडे धारावी विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे एका बाजूला तमिल सेल्वन हे धारावीची जबाबदारी स्वीकारून कामाला लागलेले असताना दुसरीकडे काँग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आता सुरु आहे. त्यामुळे आज काँग्रेसचे नगरसेवक फुटले असले तरी भविष्यात शिवसेनेचे ही काही नगरसेवक फुटल्यास गायकवाड यांच्यासमोर एक मोठा आव्हान निर्माण केले जात आहे. या मतदारसंघात काही प्रमाणात भाजपला मानणारा वर्ग असला तरीही त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने किंबहुना आजवर भाजपने या मतदारसंघाकडे गांभीर्यपूर्वक न पाहिल्यामुळे आज त्यांच्याकडे उमेदवार उपलब्ध नाही. मात्र जे माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांनी जर विभागात मन लावून काम केल्यास गायकवाड यांना येणारी विधानसभा निवडणूक जड जाईल,असे जाणकारांचे म्हणणे आहे शिवाय येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला खातेही खोलता येईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
हेही पहा –