पावसाळ्यात वसईतील पर्यटनस्थळांवर मौजमजा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात, मात्र कधी अतिवृष्टीमुळे आणि हलगर्जीमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. हे लक्षात घेता वसई तालुक्यातील पर्यटन स्थळांवर ८ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ विभागाने हे मनाई आदेश जारी केले आहेत.
वसई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरुची, रानगाव, बेनापट्टी, ब्रह्मपाडा व भुईगाव या ५ बीचवर, नायगावच्या चिंचोटी धबधबा व देवकुंडी कामण आणि वालीव येथील राजावली खदान या ठिकाणी पर्यटकांना प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या पर्यटन स्थळांवर किंवा स्थळापासून १ किलोमीटर परिसरात २५ जून ते ८ जुलैपर्यंत पर्यटकांना मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Eng : विराट कोहली उपांत्य फेरीतही स्वस्तात बाद, किंग कोहलीला झालंय काय?)
उल्लंघन केल्यास कारवाई करणार
या परिसरात आदेशाचा भंग केला, तर कारवाई केली जाणार आहे. वसई परिसरातील प्रत्येक पर्यटन स्थळावर वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याच्या उगमस्थानी जाणे किंवा पोहणे, सेल्फी काढणे, नैसर्गिक पर्यटन किंवा धोकादायक ठिकाणी मद्यपान करणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे किंवा चालवणे या बाबींवर पोलिसांनी मनाई आदेश लागू केला आहे.
पर्यटकांनी जाणे टाळावे
पिकनिकसाठी जाणाऱ्यांनी आदेश लागू केलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मान्सून काळात निसर्गाचा तसेच धबधबे, तलाव, धरण, समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अतिवृष्टीमध्ये पर्यटकांची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी गुरुवारपासून पर्यटन स्थळ, धोकादायक परिसरावर मनाई आदेश जारी केला आहे.
पौर्णिमा चौगुले – श्रींगी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २
हेही पहा –
Join Our WhatsApp Community