रविवारी सकाळपासून मुंबई व महानगर परिसरात धोधो कोसळणा-या पावसाने नवी मुंबईत १०० मिमी पावसाचा विक्रम नोंदवला. गेल्या २४ तासांत नवी मुंबईतील जुहू नगर आणि सानपाडा या दोन भागांत अनुक्रमे ११४.६ मिमी तर ११५.९ मिमी पावसाची नोंद झाली. महानगर परिसरातही पाऊस सतत सुरु असल्याने, सोमवार चाकरमानी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर टांगती तलवार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई ते वसई, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई ते पनवेलपर्यंत पावसाचे रविवारी पुनरागमन झाले. रविवारी मध्यरात्रीपर्यंत महानगर परिसरात पावसाचा सतत मारा सुरु होता. गेल्या २४ तासांच्या नोंदीत नवी मुंबईतील जुहूनगर आणि सानपाडा स्थानकांपाठोपाठ खैरणा गावात १००.६ मिमी, वाशी गावात ८९ मिमी तर डोंबिवलीत ९९.६ पावसाची नोंद झाली. विठ्ठलवाडी परिसरातही ७१.७ मिमी पाऊस झाला. मुंबईतही चिंचोली अग्निशमन केंद्रात ८३.५६ मिमी तर दिंडोशी अग्मिशमन केंद्रात ७१.१२ मिमी पाऊस झाल्याचे नोंदीत आढळले. रात्री मुंबईच्या दोन्ही कुलाबा आणि सांताक्रूझ स्थानकांत आर्द्रतेची नोंद ९५ टक्क्यांपर्यंत झाली.
( हेही वाचा: बॉलिवूडवर लोक का भडकले आहेत? )