मालाड मार्वे मार्गावर अथर्व महाविद्यालयासमोरील ६ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पी-उत्तर विभागामार्फत गुरुवारी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच मनोरंजन आणि खेळाच्या मैदानासाठी हा भूखंड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला होता. आज पी-उत्तर विभागाकडून झालेल्या कारवाईत फर्निचरची एकूण ६३ दुकाने आणि झोपड्या पाडण्यात आल्या. त्यामुळे ६.९१ एकरचा भूखंड पार्कच्या जागेसाठी मोकळा झाला असून या जागेवर लवकरच वेदिक थीम पार्कचे बांधकाम करण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. (Malad Vedic Theme Park)
मागील दोन दशकांपासून या भूखंडावर अतिक्रमण होते. या जागेवर थीम पार्क निर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी अनधिकृत दुकाने आणि झोपड्यांचे निष्कासन करणे गरजेचे होते. निष्कासन कारवाई करणार असल्याची नोटीस जुलै २०२३ मध्ये संबंधित दुकाने आणि झोपडीधारकांना पाठवण्यात आली होती. वेदिक पार्कसाठी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा भूखंड मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला असला तरीही या जागेवर झालेले अतिक्रमण हटवणे गरजेचे होते. उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पुरेशी कागदपत्रे असणाऱ्या ८ दुकानांना पर्यायी जागा किंवा आर्थिक मोबदला हा विभाग स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली. (Malad Vedic Theme Park)
(हेही वाचा – Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार)
या अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये १४ अभियंता आणि ६२ कर्मचारी यांचा समावेश होता. तर ३ जेसीबी, १ पोकलेन, ६० डंपर्सचा वापर कारवाईसाठी करण्यात आला. कारवाई नंतर या भूखंडाला कुंपण घालण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या भूखंडावर भाजपचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘वेदिक पार्क’ उभारण्याची विनंती केली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा करणारा पत्र व्यवहारदेखील त्यांनी पी उत्तर विभागासोबत केला आहे. त्यानंतर हा भूखंड ताब्यात आल्यावर ही बांधकामे हटवून वेदिक थीम पार्क उभारण्याचा मार्ग सुकर सुकर केला गेला. (Malad Vedic Theme Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community