मुंबईसह राज्यात कोरोनाचा पारा हा दिवसेंदिवस उतरताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हळूहळू नियमांमध्ये शिथिलता आणायला सुरुवात केली आहे. आता मंदिरांसह राज्यातील बरीचशी पर्यटन स्थळंसुद्धा खुली करण्यात आली आहेत.
मुंबईसारख्या शहरात विविध असंख्य प्राणी-पक्ष्यांचे दर्शन घडवण्यासाठी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीची बाग पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत राणीच्या बागेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. हे दरवाजे आता १ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
(हेही वाचाः राणी बागेतील तीन प्याऊ पुन्हा भागवणार पर्यटकांची तहान)
प्रशासनाचा आराखडा तयार
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासाठी प्रशासनाने विशेष आराखडा तयार केला असल्याचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. खबरदारी म्हणून पर्यटकांना टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल. तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी ४० सुरक्षा रक्षकांची टोळी तैनात असेल व जास्त गर्दी झाल्यास गेट बंद करण्यात येईल. मास्कशिवाय कोणालाही बागेत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष प्राधान्य दिले जाईल, अशाप्रकारची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
(हेही वाचाः पेंग्विननंतरही राणीबागेतील पर्यटकांची संख्या घटली!)
आर्थिक तोटा
पेंग्विन आगमनामुळे गेल्या काही वर्षांत प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही संख्या बारा ते पंधरा हजारांपर्यंत जाते. यामुळे प्राणिसंग्रहालयाला वर्षाला ८ ते १० कोटी उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोनामुळे पर्यटनस्थळं बंद असल्याने पालिकेला रोज जवळपास दीड लाखांचे नुकसान होत आहे.
(हेही वाचाः ‘पेंग्विन’च्या बालहट्टामुळे राणी बागेचे शुल्क वाढले! नितेश राणेंचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community