Veer Savarkar : हिंदुत्वाचे प्रेरणास्थान अंदमान

172
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वीर सावरकर (Veer Savarkar) हे हिंदू परंपरावादी कुटुंबात जन्माला आले. बालवयात ईश्वराबद्दल त्यांची मनःस्थिती भावूक असली तरी ती जास्त काळ टिकली नाही. पुढे जसजसे ते विचार करु लागले, तर्कशुद्ध दृष्टी त्यांना प्राप्त झाली तसतशी त्यांची पोथ्या पुराणांवरील श्रद्धा कमी होऊ लागली. हिंदू धर्माकडे अधिक तर्क बुद्धीने ते पाहू लागले. तत्कालीन अनेक समाजसुधारकांना इंग्रजांची भुरळ पडलेली होती किंवा त्यांना आपला धर्म अधिकच मागासलेला वाटत होता. तसेच स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. या सर्व बाबतीत सावरकरांनी समन्वय साधल्याचे दिसून येते. सावरकरांना आपल्या संस्कृतीचा अभिमान होता, राम-कृष्ण इत्यादी त्यांना इतिहास पुरुष म्हणून आदरणीय होते, त्याचवेळी हिंदू धर्मातील चुकीच्या रुढींवर ते प्रहारही करत होते. एकाच वेळी सामाजिक सुधारणा करत असताना स्वातंत्र्य चळवळ देखील सुरु होती. इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने क्वचितच कुणी काम केले असेल.

सावरकरांना हिंदूंमधील समस्यांची जाणीव विशेषतः अंदमानमध्ये झाली. अंदमानमध्ये शिरगणती म्हणजेच जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा हिंदूंमधील सांप्रदायिक वाद समोर आला. तेव्हा हिंदू शब्दाची व्याख्या करण्याचा निश्चय त्यांनी केला. पुढे जाऊन १९२३ मध्ये सावरकरांनी हिंदुत्व नावाचा प्रबंध लिहिला. मात्र अंदमान ही ठिणगी होती. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांच्या मनात याबाबतचे विचार येत होते. माझी जन्मठेपमध्ये सावरकर याबद्दल स्वतःच ग्वाही देतात, ‘‘इंग्लंडमध्ये असतानाच हिंदूंच्या सांप्रदायिक कलहाने हिंदुत्वाचे खंड खंड पडून आपल्या अखिल जातीस एका सुत्रात, एका ध्वजाखाली आणण्याचे सामर्थ्य सध्याच्या परिस्थितीत ज्या एका शब्दात उरले आहे तो ‘हिंदू’ शब्द भ्रामक विद्वेषाच्या घावाने पंगू होईल ही भीती आम्हांस चिंता उत्पन्न करु लागली.’’ अंदमानात जाण्यापूर्वी त्यांना हिंदू शब्दाबद्दल आपुलकी वाटत नव्हती का? तर १९०८ मध्ये त्यांनी ‘प्रियकर हिंदुस्थान’ नावाचे काव्य रचले होते.

(हेही वाचा Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून आणणार महाराष्ट्रात; सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांच्या प्रयत्नांना यश)

शिरगणनेच्या वेळी आर्यसमाजी लोक स्वतःचा उल्लेख ‘आर्य’ असा करू लागले आणि शीख लोक ‘शीख’ असा उल्लेख करू लागले. त्यामुळे हिंदू शब्दाचा नेमका अर्थ काय यावर सावरकरांनी या समाजाच्या बंदिवानांबरोबर चर्चा सुरु केली. पुढे या चर्चेचं रुपांतर हिंदुत्व या ग्रंथात झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सावरकर (Veer Savarkar) आल्यानंतर मुस्लिमांकडून हिंदूंना बाटवण्याचा प्रकार बंद पडला. तेथे असलेले टीचभर ‘पठाणी राज्य’ उलथवून त्यांनी ‘हिंदूराज्य’ स्थापन केले. आता हिंदू बंदिवान एकमेकांना सलाम न म्हणता रामराम म्हणू लागले. ज्यावेळी सावरकर अंदमानातून निघत होते, त्यावेळी त्यांनी सहबंदिवानांसाठी एक संदेश पाठवला होता. तो असा, ‘अंदमानातच राहा. शेती करा. आपसात लग्ने करून संतती वाढवा आणि त्या वसाहतीत हिंदू संस्कृतीचा होत चाललेला फैलाव एकसारखा वृद्धिंगत करा.’

बरेच सावरकर प्रेमी असं म्हणतात की जर मार्सेलिसमध्ये सावरकर पकडले गेले नसते तर भारताचा इतिहास वेगळा असता. पण मला वाटतं की सावरकर अंदमानमध्ये गेले म्हणून भारताला आणि जगाला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदूंचा एक सशक्त नेता लाभला. इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे नेतृत्व करण्याची तत्कालीन नेत्यांमध्ये क्षमता नव्हती. त्याकाळी हिंदूविरोधी वारे वाहू लागले होते. शिवाजी महाराजांप्रमाणे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर पाय ठेवून उभे राहण्याचे बळ सावरकरांमध्ये होते. त्यांच्या मनात असलेली हिंदुत्वाची ज्वाळा अंदमानच्या वास्तव्यामुळे बाहेर पडली. या ज्वाळेमुळे हिंदूविरोधकांशी लढण्यास हिंदूंना बळ मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.