Veer Savarkar : राहुल गांधींच्या वक्तव्यांनी वीर सावरकरांची बदनामी झाली; सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी न्यायालयात दिली साक्ष

380
काँग्रेसचे नेते राहुल गांधी लंडनमध्ये असताना अनिवासी भारतीयांच्या एका कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची बदनामी करणारी वक्तव्ये केली. या प्रकरणी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर मंगळवार, १९ डिसेंबर रोजी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक चंद्रशेखर साने यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी साने यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यांनी वीर सावरकर यांची बदनामी झाली आहे, असे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारी २०२४ रोजी ठेवण्यात आली आहे. त्यावेळी वकिलांचा युक्तीवाद होणार आहे.
या प्रकरणात २५ नोव्हेंबर रोजी सात्यकी सावरकर यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यावेळी त्यांना न्यायालयात काही साक्षीदार उपस्थित करण्यास सांगितले होते. त्यानुसार सात्यकी सावरकर यांच्याकडून वीर सावरकर साहित्य अभ्यासक चंद्रशेखर साने आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल बनकोंडे असे दोन साक्षीदार न्यायालयात उपस्थित राहिले. त्यावेळी सात्यकी सावरकर यांच्या वतीने अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी काम पाहिले.

काय म्हणाले चंद्रशेख साने? 

राहुल गांधी यांचे भाषण ऐकल्यावर मला अनेकांचे फोन आले. खरंच अशी काही घटना घडली आहे का? सावरकर (Veer Savarkar) यांची हीच विचारसरणी आहे का? असे प्रश्न मला विचारण्यात आले. मी ४० वर्षांपासून सावरकर यांचा अभ्यासक आहे. पण अशा कुठल्याही घटनेची त्यांच्या साहित्यात नोंद नाही. गांधी यांच्या या विधानामुळे सावरकरांची बदनामी झाली आहे, अशी साक्ष साने यांनी नोंदवली. राहुल गांधी यांनी त्यावेळी बोलताना ‘सावरकर आणि त्यांचे पाच-सहा मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता’, असे सावरकर (Veer Savarkar) यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले असल्याचे म्हटले होते. वास्तविक हे मॉब लिंचिंगसारख्या गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. वीर सावरकर यांची अशी कधीच विचारधारा नव्हती, असेही साने म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी डोकलामचा उल्लेख करत ‘समोरचा पक्ष कमजोर असेल तर त्याला मारावे आणि जर आपण कमजोर असू तर पळून जावे, असे सावरकर आणि संघाची विचारधारा आहे, असे विधान गांधी यांनी केले होते. वीर सावरकर यांची अशी विचारधारा कधीच नव्हती, सावरकर यांच्या साहित्यात अशी कुठेच नोंद नाही. उलट त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा उभारला, असेही साने म्हणाले.

काय म्हणाले राहुल बनकोंडे?

मी सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांचा आधार घेऊन सामाजिक काम करतो. राहुल गांधी यांचे वक्तव्य ऐकून व्यथित झालो. सावरकर खरंच अशी व्यक्ती आहे का? सावरकर दोन गटात फूट पाडण्याचे काम करतात का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. याबाबत अभ्यासकांशी चर्चा केली. त्यातून गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचे समजले, असे बनकोंडे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.