स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बी.ए. ची पदवी मुंबई विद्यापीठाने काढून घेतली होती. अशा प्रकारे पदवी काढून घेतलेले ते पहिले व्यक्ती होते. १९६० मध्ये त्यांना डिग्री परत करण्यात आली; मात्र आजही त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या अॅल्युमनीमध्ये (सन्माननीय माजी विद्यार्थ्यांच्या यादी) दिसून येत नाही. ते समाविष्ट करायला हवे, यासंबंधात कुलगुरूंनीही पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी बुधवारी, 12 एप्रिल रोजी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, ११ एप्रिलला केली. त्याचे स्वागत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, सावरकरांचे केवळ पुतळे उभारून चालणार नाही, तर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील स्मारक ‘स्फूर्तीस्थळ’ होणार; सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विविध अवमानास्पद टीकांचा, वक्तव्यांचा भाग पाहाता सावरकरांचा असा गौरव होणे यथोचितच आहे, तसे व्हायला हवेच होते. मात्र त्याचबरोबर सावरकरांचे विचारही लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात पूर्वी सावरकरांचे साहित्य अभ्यासासाठी होते. मात्र आज ते नाही. त्यामुळे सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांना त्याबद्दल अधिक कळावे म्हणून त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात आणले गेले पाहिजे, अशी मागणीही रणजित सावरकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.