समुद्री साहसाचे स्मारक…

218

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बंदीवान झालेले असताना ब्रिटीश पहारेकऱ्यांना हुलकावणी देत जहाजावरुन उडी मारली आणि समुद्रात काही अंतर पोहत जाऊन फ्रान्स देशातील मार्साय बंदराचा किनारा गाठला. ८ जुलै १९१० या दिवशीची ही घटना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अजरामर आणि अनेकांना स्फूर्ती देणारी ठरली. सावरकरांच्या त्या समुद्री साहसाने त्यांचे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नाव आंतरराष्ट्रीय इतिहासात नेहमीसाठी कोरले गेले. त्या किनाऱ्यावर त्या साहसाचे कायमस्वरुपी स्मारक होणे अत्यावश्यक होते. अनेक राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या मनात तेथे एक स्मारक व्हावे अशी इच्छा गेली अनेक वर्षे होती. अनेक सावरकर प्रेमी मंडळी त्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे किमान तीस वर्षांपासून प्रयत्न करत होती. शेवटी ते स्मारक होण्याचा योग आता अतिशय जवळ आलेला आहे. अनेक व्यक्ती आणि संस्था यासाठी प्रयत्न करीत होत्या. त्यानंतर मागील महिन्यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आले असता त्यांनी पुन: हा विषय लावून धरण्याचे आश्वासन दिले आणि त्याप्रमाणे त्यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यांच्याकडून मार्साय येथे या स्मारकासाठी हिरवा कंदील मिळाला. हा, सर्व सावरकर प्रेमींचा विजय असून सर्वांच्याच संयुक्त कष्टांना ही चांगली फळे आली आहेत.

या सागरी साहसाचे महत्व

कोणत्याही ऐतिहासिक घटनेचे महत्व त्या घटनेचे परिणाम कसे कोणावर आणि किती दूरगामी झाले त्यावर ठरते. सावरकरांचे ते साहस किती अद्भूत कल्पनारम्य आहे ते कवी, कथा कादंबरीकार यांच्यासाठी रंगवण्याचा विषय असला तरी इतिहासाच्या दृष्टीने मात्र त्यातील रम्यतेपेक्षा परिणामांचे विश्लेषण करणे अधिक महत्त्वाचे असते. सावरकर समुद्रात किती काळ पोहले, किती अंतर पोहले, किती खोल पाणी होते इत्यादी गोष्टींना फार महत्व नसते. सावरकरांनीही त्या घटनेला उगाचच अद्भुतरम्यता येऊ दिली नाही. मात्र या उडीचे जे खोल परिणाम झाले ते पहाणे इतिहासाच्या अभ्यासकांना आवश्यक आहे.

(हेही वाचा देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)

उडीचे ऐतिहासिक परिणाम

सावरकरांना क्रांतिकारकांचे अग्रणी म्हटले जाते. परदेशातच नाही तर प्रत्यक्ष लंडनमध्ये म्हणजे प्रत्यक्ष शत्रूच्या शिबिरात जाऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा लढा उभारला, अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली, ब्रिटनमध्ये शस्त्रे मिळवून भारतात पाठवली, ही सर्व कारणे सावरकरांना पकडून खटला भरुन शिक्षा ठोठावण्याला ब्रिटीशांसाठी पुरेशी होतीच, परंतु ब्रिटिशांचा सावरकरांवर अतोनात राग निर्माण व्हायची दोन प्रमुख कारणे होती, त्यापैकी एक म्हणजे सावरकरांनी लिहिलेले ‘१८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ आणि दुसरे कारण मार्साय येथे पळून जाण्याचा प्रयत्न. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक सशस्त्र क्रांतिकारकांसाठी जणू भगवद्‌गीतेसमान होते हे आता सर्वविदीत आहेच. त्याच प्रमाणे सावरकरांचे हे समुद्र साहस अशी घटना घडली की साऱ्या जगासमोर ब्रिटिशांची नाचक्की झाली. ब्रिटिशांची भारतावरील सत्ता म्हणजे सर्व काही आलबेल नसून, भारतातला एक मोठा वर्ग विशेषत: सुशिक्षित वर्ग ब्रिटिशांच्या राज्याला दैवी वरदान मानत नसून ही गुलामी झटकून टाकण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करत आहेत हे जगासमोर आले. ब्रिटिशांच्या लोकशाही न्यायी सत्ता या वल्गना पोकळ असल्याचे जगासमोर उघड झाले. युरोपातील अनेक आंदोलकांनी विशेषत: सोशॅलिस्ट चळवळींनी सावरकरांच्या या साहसाची दखल घेऊन सारा युरोप आणि अमेरिकाही ढवळून काढला. बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी सावरकरांच्या या साहसाविषयी रकाने भरुन वृत्ते प्रसिद्ध केली, विचारवंतांनी लेख लिहिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची फ्रान्स, रशिया, जर्मन, स्वित्झर्लंड सारख्या विविध देशातून प्रशंसा झाली. ‘हेग’च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ब्रिटन विरुद्ध फ्रान्स असा खटला चालला. त्यात सावरकरांची मुक्तता झाली नाही, तरी ब्रिटनच्या साम्राज्यवादी धोरणांविषयी निंदा व्हायची ती झालीच. या घटनेचे निमित्त होऊन फ्रान्समधील सोशॅलिस्ट चळवळीमुळे फ्रान्स सरकारला राजीनामा द्यावा लागला. साऱ्या जगाचे लक्ष भारतातील स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. भारतीय लोक म्हणजे बिनकण्याचे गुलामीत खितपत रहाण्यात आनंद मानणारे लोक ही धारणा पूर्णत: बदलून गेली. सावरकरांच्या या समुद्र साहसाचे महत्व त्या परिणामांत आहे.

स्मारक कसे असावे?

हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल असे या संबंधित आलेल्या बातम्यांवरुन दिसते. हे स्मारक जगासमोर भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ओळख करुन देणारे असावे. केवळ अहिंसेनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले ही जाणीवपूर्वक बनवली गेलेली धारणा या स्मारकामुळे पुसली जाऊन सशस्त्र क्रांतिकारकांचे या लढ्यातील महत्व अधोरेखित व्हायला हवे. अनेक भारतीय हुतात्म्यांचे रक्त सांडले, अनेकांनी खूप मोठे बलिदान दिले आहे, याचा इतिहास, निदान ओळख आणि कुतूहल या स्मारकाच्या माध्यमातून निर्माण व्हावे, अशी किमान अपेक्षा आहे. या शहरातील शासनाने स्मारकासाठी किती जागा देऊ केली आहे इत्यादी गोष्टी तपासूनच अर्थात याचा आराखडा तज्ज्ञांकडून तयार होईल. पण मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करुन जगासमोर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांनी जो त्याग केला, जे बलिदान दिले, त्याचे कृतज्ञता दर्शन या निमित्ताने जगापुढे यावे अशी सदिच्छा!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.