Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर उपाधीची चेष्टा करणाऱ्यांना जनतेने कदापी क्षमा करू नये; सुभाष राठी यांचे आवाहन

169
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर उपाधीची चेष्टा करणाऱ्यांना जनतेने कदापी क्षमा करू नये; सुभाष राठी यांचे आवाहन
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर उपाधीची चेष्टा करणाऱ्यांना जनतेने कदापी क्षमा करू नये; सुभाष राठी यांचे आवाहन

आजपर्यंत संपूर्ण जगात कोणालाही न मिळालेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी वि. दा. सावरकर (Veer Savarkar) यांना भारतीय समाजाद्वारे दिली गेली. ती उपाधी आम्हा भारतियांसाठी सन्मान आणि अभिमानाची घटना होय. सावरकरांना स्वातंत्र्यवीर उस्फूर्तपणे म्हटले गेले. याचे कारण त्यांनी बालवयात स्वातंत्र्यासाठी घेतलेल्या ज्वालाग्राही प्रतिज्ञेपासून तो आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मातृभूमीशिवाय अन्य कशाचेही चिंतन केले नाही. हाल, छळ, अपमान, वेदना, परिस्थितीचे आक्रमण, स्वजनांच्या मृत्यूचे दुःख, हे सारे सहन करतांना हा राष्ट्रभक्त ना कधी कुणापुढे झुकला, हारला, लाचार झाला. उलट या परिस्थितीत त्यांची चेतना आणि प्रतिभा अधिक उफाळून येत असे. त्यांनी जे अमर साहित्य निर्माण केले, ते भारताला पुढील अनंतकाळापर्यंत मार्गदर्शन करणारे असल्याने त्यांना दिलेली उपाधी ही अतिशय वास्तविक आहे. त्या उपाधीची चेष्टा करणारे राजकीय नेते हे स्वार्थापोटी चेष्टा करण्याचे महापातक करत असून जनतेने त्यांना कदापी क्षमा करता कामा नये, असे विचार साई मंदिर देवस्थान चे सचिव, तसेच विश्व हिन्दू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) जिल्हाध्यक्ष सुभाषजी राठी यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.

(हेही वाचा – Manipur: रेमल चक्रीवादळामुळे मणिपूरला मोठा फटका! पूरग्रस्त भागातून शेकडोंचा बचाव)

असा झाला कार्यक्रम

येथील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती’द्वारा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर ‘सामाजिक सेवा रत्न सन्माना’चे मानकरी डॉक्टर राजेश आसमवार, तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मानाचे मानकरी डॉक्टर राममोहन बेंदूर, सावरकर समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बोरकर, तसेच सावरकर पुतळा समितीचे अध्यक्ष हरिभाऊ वझुरकर आणि सार्वजनिक वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टिबडीवाल उपस्थित होते.

आरंभी ‘संस्कार भारती वर्धा’चे केतकी कुलकर्णी व कवी नेसन यांनी सावरकर रचित ‘अखिल हिंदू विजयी ध्वज हा’ हे गीत सादर केले. त्यांना मंगेश परसोडकर व नरेंद्र माहुरकर यांनी संगीताची साथ दिली. या प्रसंगी डॉ. राजेश आसमवार यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवारत्न सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मानाचे मानकरी डाॅ. राममोहन बेंदूर यांचाही सत्कार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

समाजाप्रती आपले काहीतरी योगदान असावे – डॉ. आसमवार

सत्काराला उत्तर देताना जनहित मंचचे सचिव डॉ. आसमवार म्हणाले, ज्या समाजात आपण रहातो. त्या समाजाप्रती आपले काहीतरी योगदान असलेच पाहिजे. वेळ, पैसा, परिश्रम आदींतील आपल्या शक्तीनुसार कार्य करणाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका न राखता केवळ घर, संसार पहाणे एक कृतघ्नपणाचे लक्षण होय. जनहित मंचने कोरोना काळात, तसेच मुक्तांगणचे निर्माण केले, ते या भूमिकेतूनच केलेले आहे.

ते पुढे म्हणाले, “निसर्गात होणारे प्रदूषण आपण जर थांबविले नाही, तर त्याचे परिणाम आपल्याला फार गंभीर भोगावे लागतील; कारण निसर्गावरच मानवी जीवन अस्तित्व संपूर्णतः अवलंबून आहे. असे सांगून त्यांना दिलेला सन्मान त्यांनी जनहित मंचला अर्पित केला.

उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

ज्येष्ठ नागरिक सन्मानाचे मानकरी डॉ. राममोहन बेंदूर यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती सांगून ते संस्कार भारतीकडे कसे वळले, याविषयी सांगितले. आजपर्यंत कसे कार्य करत आहोत, याची माहिती दिली. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र बोरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समितीच्या निर्मितीमागील इतिहास आणि उद्देश सांगून आजपर्यंत केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

ज्येष्ठ पत्रकार व लोकतंत्र सेनानी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ वझुरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक स्मृती उद्यान निर्मितीचा इतिहास सांगताना त्यातील आलेल्या अडचणी सांगून आजपर्यंत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच पुढे नेमबाजी प्रशिक्षण, भारताचा इतिहास जाणण्यासाठी इतिहासाशी संबंधित समृद्ध ग्रंथालय आणि शाळा महाविद्यालयात थोर महात्म्यांचे चित्रपट निशुल्क विद्यार्थ्यांना दाखवून या महात्म्यांप्रती त्यांच्या कार्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यासंबंधी माहिती देऊन उपस्थितांना स्मारकाद्वारे होणाऱ्या या उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

‘गाथा सावरकर’ गायनाचा कार्यक्रम सादर

या प्रसंगी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वा. सावरकर प्रश्नमंजूषा स्पर्धेत शंभरपैकी शंभर गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून वर्धा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल शेतकरी संघटनेचे पांडुरंग भालशंकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) जयंतीनिमित्त परभणी (Parbhani) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर कुळकर्णी आणि वीणा मांडाखळीकर यांनी राष्ट्रीय कीर्तनकार स्वर्गीय गोविंद स्वामी आफळे रचित ‘गाथा सावरकर’ हा संगीतबद्ध गायनाचा कार्यक्रम सादर केला. त्यांनी विनायक गाथा, इथे जन्मले प्रभु सावरकर, होळी मांडा रे साजरी, उड्डाण हे प्रथम समर्पण, कुठे वहिनी सांग साजणी, शेवटचे हे चरणी लोटांगण, आदी सावरकरांनी घेतलेल्या प्रतिज्ञेपासून तो त्यांच्या आत्मार्पणापर्यंतची गीते सादर केली.

या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. दिवाकर कुळकर्णी परभणी यांनी केले. या दोन्ही उभयतांचा समितीद्वारा सत्कार ज्योती देशपांडे आणि केतकी कुलकर्णी यांनी केला. मंचावरील मान्यवरांचा परिचय सतीश बावसे यांनी करून दिला, तर आभार मकरंद उमाळकर यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या प्राध्यापिका प्रचीती देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाला वर्धा नगरातील बहुसंख्य मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व स्त्री पुरुष व युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता .
कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, तसेच अनिल पाखोडे अतुल देशपांडे, मकरंद उमाळकर, धनंजय देशपांडे, प्रमोद रंगारी यांनी परिश्रम घेतले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.