भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यभरात ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. सावरकरांच्या जयंतीदिवशी या उपक्रमाची सांगता झाली असली, तरी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सावरकरवादी होत नाही, तोवर सावरकरांच्या विचारांचा जागर सुरू ठेवा, असे आवाहन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’ची सांगता करताना सावरकर सदन ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मंत्री लोढा सहभागी झाले. यात्रेची सांगता झाल्यानंतर विचार व्यक्त करताना ते म्हणाले, विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती यंदा व्यापक स्तरावर साजरी करता आली, याचा आनंद आहे. या आठ दिवसांच्या कार्यक्रमाची समाप्ती आज झाली असली, तरी मी सर्व सावरकरप्रेमींना आवाहन करतो, की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती जोवर सावरकरवादी होत नाही, तोवर तुम्ही ‘वीरभूमी परिक्रमा’ सुरू ठेवा. महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहील.
(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या नावाने राज्य सरकार पुरस्कार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)
माझ्याकडे कौशल्य विकास विभाग आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या २०० आयटीआय आणि ७० पोलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करा; जेणेकरून युवापिढीपर्यंत सावरकरांचे कार्य पोहचू शकेल. देशाच्या अस्मितेचे भान त्यांच्यात जागृत होईल, असेही लोढा म्हणाले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यावेळी उपस्थित होते.
अवघे दादर झाले ‘सावरकर’मय
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सावरकर सदनात राष्ट्रप्रेमींनी मोठी गर्दी केली. त्यानंतर सावरकर सदन ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी पदयात्रा काढण्यात आली. ‘मी सावरकर’ अशा टोप्या परिधान करीत हजारो सावरकर प्रेमी यात सहभागी झाले. ढोलताशांच्या गजरात सावरकर नामाचा जयघोष करण्यात आला.
- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सावरकरांची नात असिलता सावरकर-राजे पदयात्रेत सहभागी झाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकरांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा येऊन तेथे सावरकरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सावरकर लिखित ‘जयोस्तुते’ गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता झाली.