होय! मी सावरकर; भाजपा-शिवसेनेच्या वतीने राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’

130

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी ३० मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा संकल्प भाजपा आणि शिवसेनेने सोडला आहे. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी विविध ठिकाणी मिळून १०० हून अधिक यात्रा काढण्यात आल्या.

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आल्या. उत्तर पश्चिम – ६, इशान्य मुंबई – ६, दक्षिण मध्य – ६, उत्तर मध्य – ६, उत्तर मुंबई – ६, दक्षिण मुंबई – ६, अशा मुंबईतील ३६ ठिकाणी यात्रा निघाल्या. भारतमातेची प्रतिमा, वीर सावरकरांची वेशभुषा, ढोल ताशांचा गजर, पारंपारिक पोषाख, लेझिम पथकांचे तालबद्ध संचलन, अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल या यात्रांमध्ये पहायला मिळाली. भाजपा-शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

(हेही वाचा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसतात; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सकाळी १० वाजता गडकरी रंगायतन बाहेरील सावरकर स्मारकापासून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे शहरात भव्य रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे त्यात सहभागी झाले. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील विविध भागांमध्येही रविवारी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. छत्रपती संभाजी नगरमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित केलेली यात्रा सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. कारण, महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा आणि युतीची ‘सावरकर गौरव यात्रा’ एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी तेथे करण्यात आली आहे.

नवी मुंबईत १० हजारांची गर्दी

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासह सर्वसामान्य जनतेला सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वीर सावरकर गौरव यात्रे’ला राज्यभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी नवी मुंबईत भाजपने काढलेल्या यात्रेत १० हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. वाशीतील ब्लू डायमंड हॉटेलजवळ यात्रेला सुरुवात होऊन छत्रपती महाराज चौकात सांगता झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.