स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील स्मारक ‘स्फूर्तीस्थळ’ होणार; सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

148

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नव्या पिढीसाठी स्फूर्तीस्थळ व्हावे, यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, केतकी गद्रे आदी उपस्थित होते.

(हेही वाचा केवळ सावरकरांचे पुतळे उभारून चालणार नाही, त्यांचे विचार पोहोचणे गरजेचे – रणजित सावरकर)

‘नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. सावरकर वाड्यात त्यांचे बालपण गेले. त्याच घरात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला. या वाड्याला राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने स्मारकाचा दर्जा दिला आहे. हे स्मारक आणि या वाड्याच्या भिंती केवळ माती विटांच्या भिंती न राहता त्या वि. दा. सावरकर यांचा जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या बोलक्या भिंती व्हाव्यात’, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सावरकरांनी संस्कारित स्वातंत्र्याचा विचार मांडला!

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संस्कारित स्वातंत्र्याचा विचार मांडला. २१ व्या शतकात तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग करुन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास नव्या पिढीला दाखवा. भगूर या गावात प्रवेश करताच विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा, अशा पद्धतीने काम व्हावे, अशा सूचनाही या बैठकीत दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.