जेव्हा देशाला क्रियाशीलतेची गरज होती, तेव्हा भारतियांमध्ये टाळकुटेपणा वाढू नये; यासाठी वीर सावरकर (Veer Savarkar) अध्यात्माचा विषय टाळत असत. असे असले, तरी त्यांनीही स्वातंत्र्यलक्ष्मीची उपासना केली होती. तुम्ही जर ब्रह्मापर्यंत गेलात, तरच निर्भीडपणे कार्य करता येते. सत्य म्हणजे ब्रह्म. सावरकरांनी सत्याचा शोध घेतला. त्यांचे प्रत्येक वाक्य वेदवाक्यच होते. ठाण्याच्या कारागृहात असतांना ते रोज सकाळी पातंजल योगसूत्राचे (Patanjali Yog Sutra) पठण करत असत. सावरकरांच्या चरित्रात पातंजलयोगसूत्राच्या पाठणामुळे आलेल्या अनुभवांचे अनेक दाखले मिळतात, असे प्रतिपादन गोपाळ सारंग यांनी केले. ते ‘विज्ञान निष्ठ सावरकर आणि अध्यात्म’ या विषयावर बोलत होते.
(हेही वाचा – निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी Election Commission चा पुढाकार)
अखिल भारत हिंदू महासभा परळ, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अध्यात्म संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने दादर येथे सावरकर भक्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले, प्रमुख पाहुणे वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे, तर विशेष अतिथी हरिश्चंद्र शेलार हे उपस्थित होते.
या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर आणि सदस्य शैलेंद्र चिखलकर, स्मारकाच्या विश्वस्त आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असिलता सावरकर राजे हेही उपस्थित होते.
सावरकरांच्या आत्मचरित्रात पुनर्जन्माचाही उल्लेख
गोपाळ सारंग (Gopal Sarang) यांनी वीर सावरकरांच्या जीवनातील अध्यात्माचे अनेक दाखले दिले. ते म्हणाले, विज्ञान विशिष्ट ज्ञान, तर अध्यात्म हा स्वतःच्या आतमध्ये डोकावण्याचा विषय आहे. सावरकर म्हणत अध्यात्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. वीर सावरकर हे विज्ञानवादी असले, तरी त्यांनी आत्मचरित्र लिहिताना स्वतःची कुंडली शोधली. त्यांच्या दोन्ही भावांची पत्रिका मागवली. त्या वेळी सावरकर म्हणाले होते, ‘माझा या शास्त्रावर विश्वास नसला, तरी अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल.’ त्या काळात या सगळ्याचा अतिरेक झाल्यामुळे ते ज्योतिषशास्त्राविषयी (Astrology) चकार शब्द काढत नव्हते. सावरकरांच्या आत्मचरित्रात पुनर्जन्माचाही उल्लेख आहे. ‘हा विषय विज्ञाननिष्ठ पद्धतीने हाताळला गेला पाहिजे’, असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे. गणित ज्योतिषाचा उपयोग ग्रहस्थितीवरून तारीख काढण्यासाठी होतो. सावरकरांनी म्हटले होते की, इतिहास फक्त हिंदूंनीच जपला आहे.
…तेव्हाच यश येते
काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतांना कोलू फिरवताना वीर सावरकर बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर त्यांनाही एक क्षण वाटले, एवढ्या यातना सोसण्यापेक्षा आत्महत्या करावी. तरीही त्यांना लगेच जाणीव झाली, असे मरण्यापेक्षा गोऱ्या शत्रूला मारता मारता मरूया. त्यांनी आत्मबळाच्या आधारावर या विचारावर मात केली आणि कार्य पूर्ण झाल्यावर प्रायोपवेशन करून आत्मार्पण केले. कर्म आणि ज्ञान यात परिपूर्ण झालो, तरच यश येते. ब्रह्मापर्यंत पोहोचल्यावरच कर्म आणि ज्ञानाची शुद्धी होते. त्यामुळे वीर सावरकर जरी विज्ञाननिष्ठ असले, तरी ते अध्यात्मही (Spirituality) जगत होते, हेच यावरून दिसून येते, असे सारंग यांनी सांगितले. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community